
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट व भाजप यांच्यात नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी सुरू असतानाच या दोन पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये ‘डोकेफोडी सुरू झाली आहे. बीएसयूपी घरांच्या रजिस्ट्रेशन सवलतीचे श्रेय घेण्यावरून भाजप व शिंदे गटाचा वाद विकोपाला गेला आणि भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी गुरुवारी रात्री शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना फटकावले. याप्रकरणी पवार यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, डोंबिवली, कल्याण येथे शिंदे गट व भाजप यांच्यात पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांकडे खेचण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे भाजप व शिंदे गटात रोजच खटके उडत आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात फोडाफोडी नाट्य रंगले असतानाच आता ठाण्यात डोकेफोडीचा नवा अंक सुरू झाला आहे.
ठाण्यात शिंदे गट व भाजपचे कार्यकर्ते यांच्यात रजिस्ट्रेशन सवलतीचे श्रेय घेण्यावरून चढाओढ सुरू असताना पाचपाखाडी येथील लक्ष्मी नारायण सोसायटीच्या आवारात शिंदे गटाचे पदाधिकारी महेश लहाने, हरेश महाडिक व अन्य कार्यकर्ते गुरुवारी रात्री जल्लोष करत होते. त्याचवेळी भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे आले आणि बीएसयूपीच्या सवलतीचे श्रेय तुम्ही का घेता असा जाब विचारला. बीएसयूपी योजना लागू करून पाचपाखाडीमधील रहिवाशांना आपण घरे मिळवून दिली असल्याचेही पवार यांनी शिंदे गटाला सुनावले. एवढेच नव्हे तर महेश लहाने व हरेश महाडिक यांना फटकावत कानाखाली आवाज काढला. मारहाणीनंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन पवार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
सरकारने बीएसयूपीच्या घरांच्या रजिस्ट्रेशनमध्ये सवलत देण्याची घोषणा केली. केवळ शंभर रुपयांत दस्तनोंदणी करता येणार असून त्याचा फायदा ठाण्यातील सहा हजारांहून अधिक घरांना होणार आहे.
या निर्णयाचा पाठपुरावा आपण केल्याचा दावा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला. तर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनीदेखील प्रेसनोट काढून सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली.
आरोप फेटाळले
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप नारायण पवार यांनी फेटाळून लावला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, तुम्ही कामे करून मते घ्या, स्टंटबाजी करू नका. मी १९९२ पासून काम करीत असून पाचपाखाडीमधील रहिवाशांना एकत्र करून बीएसयूपीची योजना बनवली. तसेच महासभेत ठराव मंजूर करून १८५ जणांना घरे मिळवून दिली आहेत. त्याचा जल्लोष करणाऱ्यांनी विचार करावा. आपण कुणालाही मारहाण केली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


































































