ठाण्याला डेंग्यू, मलेरियाचा विळखा; २५ दिवसांत १५९ रुग्ण; एकाचा मृत्यू

ठाणेकरांवर डेंग्यू आणि मलेरियाने जोरदार हल्ला चढवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये पाच तर मलेरियाच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 25 दिवसांत ठाणे शहारत डेंग्यूचे 33 तर मलेरियाचे एकूण 126 रुग्ण आढळले असून कोपरीत डेंग्यूने एका तरुणाचा बळी घेतल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ठाण्यात ताप, थंडी, सर्दी व साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. ऐन सणासुदीला या आजारांनी डोके वर काढल्याने ठाणेकरांचे टेन्शन वाढले आहे. ठाणे महापालिका हद्दीत जानेवारी ते ऑगस्टपर्यंत डेंग्यूचे 117 रुग्ण तर गेल्या आठ महिन्यांत मलेरियाचे 466 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णात वाढ झाली असल्याने पालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी घरोघरी जाऊन चाचणी करत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बिल्डरांवर महापालिका मेहेरबान; साडेसहा कोटींची वसुली केलीच नाही

शहरातील एखाद्या सर्वसामान्य नागरिकाने मालमत्ता कर किंवा पाणीपट्टी थकवल्यास तत्काळ ठाणे महापालिकेचे पथक कारवाईसाठी दाखल होते. मात्र ठाणेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या बिल्डरांवर प्रशासन मेहेरबान असल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी डेंग्यू, मलेरियाचे अड्डे बनवणाऱ्या 194 बिल्डरांवर 6 कोटींहून अधिक दंड आकारण्यात आला. प्रशासनाने अद्याप त्या दंडाची वसुलीच केली नाही. दरम्यान प्रशासन टाळाटाळ करीत असून पालिका अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत, असा सवाल विचारला जात आहे.