यहा भय्या लोगो की ही चलेगी, ठाण्यात मद्यपी परप्रांतीयांची धमकी

ये मुंबई नही है, ये गांधीनगर है, यहा भय्या लोगो की ही चलेगी… अशी धमकी एका मद्यपी परप्रांतीय तरुणाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिली असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. याप्रकरणी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात परप्रांतीय राकेश यादव याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

ठाण्यातील गांधीनगरातील वाईन शॉपबाहेर राकेश यादव या मद्यपीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांचे नाव घेऊन त्यांना चक्क शिवीगाळ करत त्यांच्यावर वार करण्याची धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकारानंतर मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले. पोलिसांनी धमकी देणाऱ्या राकेश यादवला ताब्यात घेतले आहे. हे भाजपचे कटकारस्थान असून उत्तर भारतीय आणि मराठी असा वाद निर्माण व्हावा अशी काहींची इच्छा आहे. त्यामुळे काही लोकांची हिंमत वाढते असा आरोप अविनाश जाधव यांनी केला.