
शहरातील गणेश चौक परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना एका संशयास्पद रिक्षामध्ये धारदार शस्त्रे आढळून आली. पोलिसांनी ही शस्त्रे ताब्यात घेतली असून चालकासह त्याच्या साथीदारालाही अटक केली आहे. ही शस्त्रे कुणी दिली व कुठे नेण्यात येत होती याचा शोध पोलिसांनी सुरू केला असून घातपातापूर्वीच सर्व शस्त्रे ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी अनंत कदम हे डोंबिवली पश्चिम हद्दीत नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत होते. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास चालवताना आढळला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कर्मचाऱ्यांनी त्याला हटकले. चौकशीदरम्यान रिक्षाचालक दीपक वेलकर (24) तसेच त्याच्यासोबत असलेला सहप्रवासी प्रेम जाधव (22) यांची कसून चौकशी केली. तसेच रिक्षाची झडती घेतली असता आतमध्ये धारदार शस्त्रे सापडली.
कसून चौकशी सुरू
विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन रिक्षाचालक दीपक वेलकर व त्याचा साथीदार प्रेम जाधव या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे प्रमुख श्रीराम पाटील यांनी दिली.



























































