
ऑनलाइन फसवणूक, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून भामटे ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करत आहेत. या वाढत्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र अशा या ज्येष्ठ नागरिकांची चिंता मिटली असून आणीबाणीच्या वेळी एका क्लिकवर त्यांना पोलिसांची मदत मिळणार आहे. या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठाणे पोलिसांनी अॅप सुरू केला असून हा अॅप ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारवड ठरला आहे.
ज्येष्ठ नागरिकांचा मानसिक-शारीरिक छळ, फसवणुकीच्या घटनांमध्ये झालेली वाढ पाहता ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून त्यांच्या सुरक्षेसाठी ‘आधारवड’ अॅपची स्थापना केली आहे. या अॅपच्या मदतीने त्यांना आपत्कालीन काळात तत्काळ मदत मिळणार आहे. कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन राऊत, सीताराम गावीत, जितेंद्र खलाटे, दीपक पाटील, करण जवाने यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. हे पथक ज्येष्ठ नागरिक कट्टा, मैदाने व सार्वजनिक ठिकाणी पोहोचून ज्येष्ठ नागरिकांना अॅप डाऊनलोड करण्यासाठी मदत करत आहेत. तसेच या अॅपचे फायदे व वापर कसा करावा याची माहिती देत आहेत. त्यामुळे हा अॅप ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवनरक्षक ठरणार आहे.
ही आहेत वैशिष्ट्ये
- एका क्लिकवर थेट पोलिसांशी संपर्क साधण्याची सुविधा
- आपत्कालीन परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना झटपट मदत मिळणार
- कुटुंबीयांचे व नातेवाईकांचे मोबाईल नंबर सेव्ह करण्याची सोय
- मदतीसाठी ज्येष्ठांसोबत संपर्क करणे सोपे होणार