
महागड्या गाडीवर ठाणे महापालिकेचा लोगो लावून एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दोघांच्या भिवंडी गुन्हे शाखा दोनच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहे. तन्वीर अन्सारी (२३), महेश देसाई (३५) अशी अटक केलेल्या दोघा तस्करांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी ३१ कोटी ८४ लाख ८० हजारांचे तब्बल १५ किलो ९२४ ग्रॅम एमडी जप्त केले आहे. या दोघांकडून पोलिसांनी महापालिकेचा लोगो असलेली बीएमडब्ल्यू व स्विफ्ट डिझायर कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
भिवंडी बायपास येथील रांजणोली येथे दोघे जण अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा दोनच्या पथकाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या पथकाने रांजणोली येथील ओम साई फॅमिली ढाब्यासमोर सापळा रचला. नाकाबंदीदरम्यान त्यांना एक स्विफ्ट डिझायर कार संशयास्पद वावरताना आढळून आली. ही कार ताब्यात घेऊन पोलिसांनी तन्वीर अन्सारीला ताब्यात घेत झडती घेतली असता त्यांना ११ किलो ७६३ ग्रॅम एमडी मिळाले. दरम्यान पोलिसांनी महापालिकेचा लोगो लावलेली बीएमडब्ल्यू गाडी थांबवली. यावेळी पोलिसांना बघून चालक महेश देसाई याची बोबडी वळली. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी गाडीची झडती घेतली. यावेळी गाडीत पोलिसांना ४ किलो १६१ ग्रॅम एमडी मिळाले.
ड्रग्ज सिंडीकेटचे कंबरडे मोडले
तन्वीर अन्सारी आणि महेश देसाई हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. तन्वीरविरोधात एनडीपीसी अॅक्टनुसार डायघर, भायखळा व मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून तो फरार होता. तर महेशवर कोल्हापुरातील आजरा पोलीस ठाण्यात एनडीपीसी अॅक्ट व एमसीओसीनुसार चार गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हे दोघेही आंतरराष्ट्रीय टोळीचे सदस्य असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यांनी एवढा मोठा साठा कुठून आणला आणि कुणाला विक्री करणार होते याचा शोध पोलीस घेत आहेत. हा साठा पकडल्याने ड्रग्ज सिंडीकेट चालवणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.