ठाणे रेल्वे स्थानक झाले गारेगार, घामाघूम प्रवाशांना मोठा दिलासा

उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला असून रेल्वेने प्रवास करणे म्हणजे दिव्य वाटू लागले आहे. उष्णतेमुळे प्रवाशांची लाहीलाही होत असून रेल्वे प्रशासनाने ऐन उन्हाळ्यात मोठा दिलासा दिला आहे. ठाणे रेल्वे स्थानकात सहा अत्याधुनिक पंखे बसविले असून स्टेशन खऱ्या अर्थाने गारेगार झाले आहे. प्रतिसाद लक्षात घेऊन पंख्यांची संख्या वाढवली जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 21 लाख रूपये एवढा खर्च आला आहे.

ठाणे हे सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून प्रसिध्द आहे. दुपारी 12 ते 4 या दरम्यान प्रवासी अतिशय घामाघूम होतात. कोरोनाच्या संकटामुळे नेहमीसारखा गर्दी नसली तरी कामावर जाणाऱ्या व येणाऱ्या चाकरमान्यांमुळे लोकल खचाखच भरलेली असते. ठाणे रेल्वे स्थानकात एकूण 10 फलाट असून बहुतेक ठिकाणी प्रवासी मोठ्या संख्येने उभे असतात. उन्हाचा पारा वाढत जाऊन हे प्रवासी घामाघूम होतात. फलाटांवर जुने पंखे असले तरी त्यापासून फारसा दिलासा मिळत नाही.

रेल्वे प्रशासनने उन्हाळ्यात प्रवाशांना थंडावा मिळावा म्हणून फलाट क्रमांक 1 व 10 वर प्रत्येकी तीन पंखे बसवले आहेत .या पंख्याचा आवाज येत नाही. शिवाय वाऱ्याचा फोर्सही जास्त असल्याने प्रवाशांना थंडा थंडा कूल कूलचा अनुभव येत घेता येतो. प्रत्येक पंख्याला तीन पाती आहेत. अत्याधुनिक टेक्नॅालॉजीचा वापर त्यात करण्यात आल्याने विजेचीदेखील मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे. या उपक्रमामुळे लोकलने रोज प्रवास करणारे प्रवासी कूल झाले आहे.

प्रयोग यशस्वी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच भायखाळा रेल्वे स्थानकात अशा प्रकारचे अत्याधुनिक पंखे यापूर्वीच प्रशासनाने लावले आहे. त्याचा चांगला उपयोग होत असल्याचे दिसून आल्याने ठाणे स्थानकातदेखील हा प्रयोग केला असल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना दिले.

आपली प्रतिक्रिया द्या