सामना ऑनलाईन । ठाणे
महामार्गावर दरोडा टाकून वाहनचालकांना लुटणाऱ्या 8 जणांच्या टोळीचा छडा ठाणे पोलिसांनी लावला आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या युनीट 1 ने या प्रकरणी आरोपींना कर्नाटकातील गुलबर्गा येथून जेरबंद केले आहे. दरोड्यांसह ही टोळी जनावरांचीही चोरी करून कत्तलीसाठी विकत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी या टोळीकडून एक कार, रोख रक्कम, पाच मोबाईल आणि जनावरांना गुंगी देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या 3 बाटल्या व इंजेक्शन असा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र या टोळीचा म्होरक्या फरार आहे. ठाणे न्यायालयाने सर्व आरोपींना 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ठाण्याच्या कळवा पोलीस ठाण्यात 16 सप्टेंबर रोजी सोहेल शेख याच्या तक्रारीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता.11 सप्टेंबर रोजी सोहेल आणि त्याचे मालक नौशाद शेख मुंबईतील डोंगरी येथून मालाचे पैसे घेवून कारने संगमनेरकडे जात होते. यावेळी खारेगांव टोलनाक्यावर त्यांच्या गाडीसमोर कार आडवी टाकून 7 ते 8 जणांनी जबदरस्तीने गाडीसह सर्वाना मुंब्रा बायपासवर नेत मारहाण केली.तसेच,त्यांच्याकडील रोकड आणि मोबाईल व कार असा 4 लाख 42 हजारांचा ऐवज घेवून पसार झाले. याप्रकरणी कळवा पोलीस आणि गुन्हे शाखा तपास करत असताना, यातील आरोपी चोरलेल्या मुद्देमालासह कर्नाटक येथील गुलबर्गा येथे पळून गेल्याची माहिती युनीट एकला मिळाली. त्यानुसार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने कर्नाटकातील 150 लॉजची तपासणी करून एका लॉजमध्ये मुंबईतील काहीजण असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून भिवंडीतील मोजम शब्बीर शेख, अबु फैसल अन्सारी, सय्यद वाजीद सय्यद मुसा, फिरोज अकबर सय्यद, मोहम्मद हुसैन अब्दुल रहेमान शेख, मोहम्मद शाकीर मोहम्मद कासीम शेख आणि वाहिद शौकत शेख यांना अटक केली. तर,म्होरक्या अकबर शौकत शेख फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.






























































