हप्ता वसुलीचा वाद जीवावर बेतला, ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या

फेरीवाल्यांकडून गोळा केल्या जाणाऱ्या हप्ते वसुलीच्या वादातून ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सायंकाळी उशिरा घडली. रविंद्र परदेशी असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो ठाण्यातील कुप्रसिध्द गुंड बारक्या परदेशी याचा भाऊ होता. या घटनेने मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ठाण्यातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ठाण्यातील जांभळी नाका बाजारपेठेतील पेढ्या मारुती मंदिराजवळ हा प्रकार घडला. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी रविंद्र यांच्यावर चाॅपरने वार केले. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हा प्रकार बाजारपेठेतील फेरीवाल्यांकडून गोळा केल्या जाणार्‍या हफ्ते वसुलीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दरम्यान, या घटनेतील हल्लेखोर रात्री उशिरा ठाणेनगर पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली.