
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील आडोशी बोगद्याजवळ टँकर उलटून तब्बल 32 तास वाहतूक कोंडी झाली होती. ही कोंडी सुटत नाही तोच पुण्यानंतर आज नाशिककडे जाणारा मार्ग अक्षरशः बोंबलला. ठाण्यातील दोन अपघातांमुळे मुंबई-नाशिक हायवे दीड तास ठप्प होता. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांचे हाल झाले. स्थानिक पोलीस तसेच वाहतूक शाखेच्या पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक कोंडी सोडवली. दरम्यान मुंबई-नाशिक हायवेवर रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने कोंडी होत असल्याने प्रवाशांच्या नशिबी मनस्तापच असल्याचे दिसून आले आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून ठिकठिकाणी मातीचे ढीग, जेसीबी, डंपर आहेत. यातून मार्ग काढताना वाहनचालकांची दमछाक होते. त्याशिवाय रोज या मार्गावर कुठे ना कुठे अपघात होत असतात. दहिसर येथे राहणारा आकाश पुजारी (20) हा त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी दुचाकीवरून मित्रांसोबत जात होता. तो त्याच्या गाडीवर एकटाच होता. सकाळी पावणे सहाच्या सुमारास तो खारेगाव टोलनाका येथे येताच त्याचे नियंत्रण सुटले व आकाश थेट पंटेनरच्या चाकाखाली चिरडला गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे सुमारे एक तास मुंबई-नाशिक महामार्गावर तुफान वाहतूक कोंडी झाली.
टेम्पो उलटला
खारेगाव येथील अपघातानंतर झालेली वाहतूक कोंडी दूर होत नाही तोच सकाळी दहाच्या सुमारास माजीवडा जंक्शनवरील रुस्तुमजी इमारतीसमोर महामार्गावर दुसरा अपघात झाला. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱया टेम्पोने सिमेंट दुभाजकाला जोरदार धडक दिली. त्यानंतर हा टेम्पो नाशिककडे जाणाऱया लेनवरील कारवर आदळून उलटला. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. अपघातामुळे नाशिककडे जाणाऱया लेनवर सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती.




























































