
चेन स्नॅचिंगच्या घटना एकीकडे वाढत असताना आता तरुणींना रस्त्यात एकटी गाठून त्यांचा मोबाईल हिसकावण्याचे प्रकारही आता उघडपणे घडू लागल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे या अनुभवातून गेलेल्या उल्हासनगरच्या एका तरुणीने टपोरींच्या धसक्याने कॉलेजच सोडले आहे. टपोरींच्या भीतीने मुलीने कॉलेजला जाणेच सोडल्याने पीडितेच्या पित्याने शिवसेनेकडे धाव घेतली आहे. त्यामुळे जोपर्यंत या टपोरींचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत मोठ्या भावाप्रमाणे संरक्षण देण्याची जबाबदार युवासेनेने उचलली आहे.
कॅम्प नंबर 3 परिसरात सतनाम कॉलनीमध्ये राहणारी ही तरुणी नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी 8 वाजता सपना गार्डनच्या मार्गाने कॉलेजला जात होती. त्यावेळी मोटारसायकलवर आलेल्या दोन टपोरी तरुणांनी तिला अडवून मारहाण केली. इतकेच नव्हे तर तिला खाली पाडून तिचा मोबाईल हिसकावून पळ काढला. या घटनेत पीडितेचा पायही फ्रॅक्चर झाला. घडला प्रकार समजताच पीडितेच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. तिला रुग्णालयात दाखल करून पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र तक्रार केल्यावरही टपोरींना पकडण्यात पोलिसांना यश येत नसल्याने यादव यांनी शिवसेना शहरप्रमुख, सभागृहनेते राजेंद्र चौधरी यांच्याकडे धाव घेतली. चौधरी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तपासाला वेग आणण्याची मागणी केली. दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी टपोरींचा शोध सुरू केला आहे.




























































