
काकाने जादूटोणा केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून एका इसमाने आपल्या मित्रांच्या साहाय्याने काकाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी शीळ डायघर परिसरात घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या सहा तासांतच दोन आरोपीना अटक केली असून, अन्य तीन आरोपी फरार आहेत.
पिंपरी गावाच्या मागे असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी गवतामध्ये काही कामगारांना शुक्रवारी सकाळी पावणेदहा वाजता मृतदेह आढळून आला. ४० ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तीचा हा मृतदेह होता. मात्र त्याचे केवळ धडच होते, शीर धडावेगळे करण्यात आल्याने नेमका मृतदेह कोणाचा आहे हे कळू शकले नव्हते. मृतदेह पाहणाऱ्या कामगारांनी पोलिसांना याबाबत कळवले. याबाबतची माहिती मिळताच डायघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची चौकशी सुरू असता नाच पोलिस ठाण्यात एक व्यक्तीची बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी काहीजण आले होते. त्यावेळी तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तींना मृतदेह दाखवला असता त्यांनी तो ओळखला. दहिसर येथील विष्णू किसन नागरे (45) यांचा तो मृतदेह असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी ओळखले. मृतदेहाची ओळख पटल्यामुळे पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली.
पोलिसांनी विष्णू यांचा पुतण्या अमित नागरे (१९) याच्यावर संशय असल्याने त्याला अटक केली. पोलिसांनी अमितची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. काका विष्णू यांनी जादूटोणा केल्यामुळे आपल्या वडिलांचा मृत्यू झाला असा त्याला संशय होता. याच रागातून अमितने आपल्या चार मित्रासह काकांना संपवण्याचा कट रचला. अमित त्याच्या काकाला दारू पिण्यासाठी निर्जनस्थळी घेऊन गेला. यानंतर त्याने त्याच्या चार मित्रांच्या साहाय्याने धारदार हत्याराने त्यांच्यावर वार केले. विष्णू यांचे मुंडके धडावेगळे करून ते दिवा येथील डम्पिंग ग्राऊंडवर फेकून दिले.हत्येची कबुली दिल्यामुळे पोलिसांनी अमित आणि त्याचा मित्र अमर शर्मा (२२) या दोघांना अटक केली आहे. या हत्येतील इतर तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

























































