ठाण्यात आणखी एक रस्ता खचला, वागळे इस्टेट येथील कामगार हॉस्पिटल नाक्यावरील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मलनिस्सारण वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना ठाणे पूर्वेच्या बारा बंगला परिसरात रस्ता खचण्याची घटना ताजी असतानाच आज सायंकाळी ठाण्यात वागळे इस्टेट येथील कामगार हॉस्पिटल नाक्याजवळील रस्ता खचला. या रस्त्याच्या मध्यभागी भगदाड पडले असून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या मार्गावरून जाणारी वाहतूक एकमार्गी बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, याच रस्त्याच्या पुढील भागात काही महिन्यांपूर्वी व त्याआधी गेल्यावर्षीदेखील अशाच पद्धतीने रस्ता खचला होता.

ठाणे पूर्वेच्या बारा बंगला परिसरात रस्ता खचण्याच्या घटनेला आठवडा उलटत नाही तोच सावरकर नगरनजीक असलेल्या कामगार हॉस्पिटल नाक्याजवळ तीन ते चार फुटी खड्डा रस्त्याच्या मधोमध पडला. या खड्डय़ापासून काही मीटर अंतरावर जुलै महिन्यात व त्याआधी तेथून हाकेच्या अंतरावर असलेला रस्ता गेल्या वर्षी खचला होता. त्यावेळी या रस्त्याची दुरुस्ती करून वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता. मात्र आज रस्ता खचल्यानंतर पुन्हा एकदा या मार्गावरून एक मार्गी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

याच रस्त्यावरून टीएमटीच्या लोकमान्यनगर आगारात जाणाऱया बसेस धावतात. त्यांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आले असून रविवारी या रस्त्याची दुरूस्ती केल्यानंतरच या मार्गावरून वाहतूक पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र हा मुख्य रहदारीचा रस्ता असल्याने या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी होण्याचा अंदाज स्थानिकांनी वर्तवला आहे.