केंद्राची ‘टीईटी’ आता मराठीतूनही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये शिक्षकपदी रुजू होण्यासाठी घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) आता मराठीतूनही देता येणार आहे. या परीक्षेसाठी राबविण्यात येणारे इंग्रजी, हिंदी, ऊर्दू हे त्रिभाषा माध्यमाचे सूत्र केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने रद्द केले असून यापुढे ही परीक्षा हिंदुस्थानातील 20 मातृभाषांमधून देता येणार आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सीबीएसई बोर्डासाठी सूचना जारी केल्या असून टीईटी देशातील 20 माध्यमांतून घेण्यात यावी, असे स्पष्ट केले आहे. जावडेकर यांनी या निर्णयाविषयी ‘ट्विट’ केले आहे. डीएमकेच्या नेत्या कनिमोझी यांनी आज ‘ट्विटर’वरून टीईटी परीक्षेचे मातृभाषांचे माध्यम रद्द केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला होता. सीबीएसई बोर्डाचा हा निर्णय निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सीबीएसई बोर्डामध्ये शिकणाऱया ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा तामीळ आहे त्यांना त्यांच्या भाषेचा शिक्षक न मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, असेही कनिमोझी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

या मातृभाषांमध्ये होणार केंद्राची टीईटी

हिंदी, मराठी, इंग्रजी, ऊर्दू, आसामी, बंगाली, गारो, गुजराती, कानडी, खासी, मल्याळम, मणीपुरी, मिझो, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, तामीळ, तेलगू, तिबेटीयन.

मातृभाषेऐवजी हिंदी, संस्कृतची सक्ती

सीबीएसई बोर्डात शिकणाऱया विद्यार्थ्यांवर मातृभाषेऐवजी हिंदी आणि संस्कृत भाषा अभ्यासण्याची सक्ती केली जाते, असा आरोप कनिमोझी यांनी केला आहे. हा प्रकार म्हणजे देशातून इतर भाषा कायमच्या हद्दपार करण्यासारखाच आहे. सीबीएसई शाळांमध्ये सुरू असलेली ही सक्ती म्हणजे ‘हिंदी, हिंदू आणि हिंदुस्थान’ला खतपाणी घालण्यासारखेच असल्याचेही कनिमोझी यांनी ट्विट केले आहे.