टँकरखाली येऊन बालकाचा मृत्यू

accident-common-image

सामना ऑनलाईन , सटाणा

पाणीटंचाईचा बळी

जून महिना उजाडला असतानाही सटाणा शहरासह बागलाण तालुक्यात शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने शेतकरी हैराण झाले आहेत. आपल्या शेतातील फळबागा व भाजीपाला वाचविण्यासाठी लांब अंतराहून पाण्याचे टँकर भरून आणून शेतातील पिके जगविण्यासाठी धडपड करणाऱ्या बागलाणमधील शेतकऱ्याच्या कुटुंबातील अकरा वर्षांच्या बालकाचा  टँकरखाली सापडून मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यातील वीरगाव येथे शोककळा पसरली आहे. बागलाण तालुक्यात पाणीटंचाईचा पहिला बळी गेल्याने तालुक्यातील पाण्याची भीषणता समोर आली आहे.

बागलाण तालुक्यातील वीरगाव येथील शेतकरी नंदकुमार हिरामण गांगुर्डे यांची दसाना रोडवर सुमारे 6 एकर शेती आहे. सद्यस्थितीत शेतामध्ये गांगुर्डे यांनी डाळिंब व भाजीपाला लावलेला आहे. भरउन्हाळय़ात शेतात जेमतेम पाणी असताना व विकतचे पाण्याचे टँकर परिसरातून उपलब्ध करून आपल्या शेतातील पिके वाचविण्यासाठी धडपड सुरू ठेवली होती. सकाळी वीरगावपासून 6 किमी अंतरावरील वटार येथून ते शेतीसाठी पाण्याचे टँकर भरून आणत होते. शाळेला सुट्टी असल्याकारणाने इयत्ता सहावीत शिकणारा अक्षय हा सोबत आलेला होता.

टँकर भरून परतत असताना टँकरवरून अक्षय खाली पडला. टँक्टरच्या चाकाखाली सापडल्याने तो जागीच ठार झाला. गेल्या दोन महिन्यांपासून दुष्काळाशी सामना करीत असलेल्या गांगुर्डे परिवाराला अक्षयची मोलाची मदत होत होती. गेल्या दोन महिन्यांपासून दररोज सकाळी तो वडिलांसोबत पाण्याचे टँकर भरून शेतीसाठी पाणी आणीत होता. वेळप्रसंगी परिसरातील नागरिकांना पिण्यासाठीदेखील तो टँकरने पाणी वाटप करून शेतीला मदत करीत असल्याने अक्षयच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या