मांसविक्रीवर बंदीचा निर्णय म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला; हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर टीका

स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला सरकारने मंसविक्रीवर बंदी घातली आहे. ही बंदी म्हणजे भाजपचा सार्वभौमत्वावर हल्ला आहे. विविधतेत एकता हेच आपल्या देशाचे वैशिट्य आहे. देशाचे वैशिष्य नष्ट करण्याचा भाजपता प्रयत्न आहे. कोणी काय खावे, काय घालावे हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. आता सरकार याबाबतही बंद घालत आहे. हे सरकार फक्त बंदी सरकार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

संसदेत विरोधी पक्षांना बोलू दिले जात नाही. विरोधकांचा आवाज दाबण्यात येत आहे. त्यामुळे मतचोरी विरोधात एकत्र येत विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. या मतचोरी विरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुरावे दिले आहेत. तरीही निवडणूक आयोग किंवा सरकारकडून काहीही उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे मतचोरीबाबत रस्त्यावर उतरत आम्ही हा विषय जनतेपर्यंत पोहचवत आहोत, असे त्यांनी सांगितले.

कबुतरखान्याच्या मुद्द्याबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर राखत, त्याचे पालन झाले पाहिजे. कबुतरांना जगण्याचा अधिकार आहे, तसा माणसांनाही आहे. कबुतराची विष्ठा आणि पखांमधून विविध विषाणूंचा प्रसार होत असल्याने अनेकांना फुफ्फुसांचे आणि श्वसनाचे आजार होत आहे. त्यामुळे यावर न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य आहे. मात्र, आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी सरकारकडून असे विषय मुद्दाम पेटवण्यात येत आहे. पालकमंत्री लोढा यांनी त्यांच्या अनेक इमारतींपैकी एक इमारत कबुतरांसाठी द्यावी, म्हणजे हा प्रश्न सुटेल, असा टोलाही त्यांनी लगावला.