आयफेल टॉवरची वाढली उंची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पॅरिसमधील अत्यंत लोकप्रिय आणि ऐतिहासिक आयफेल टॉवर मंगळवारी अवघ्या 10 मिनिटांत 6 मीटर उंच झाला. आयफेल टॉवरची उंची आता 330 मीटर झाली आहे. एक नवा डिजिटल रेडिओ अँटिना बसवण्यात आल्याने टॉवरची उंची वाढली आहे. हे उपकरण हेलिकॉप्टरच्या मदतीने बसवण्यात आले.

आयफेल टॉवर 19 व्या शतकात इंजिनीअर गुस्ताव आयफेल यांनी कागदावर बनवला होता. त्याच्या प्रत्यक्ष निर्मितीस 26 जानेवारी 1887 रोजी सुरुवात झाली. 300 मजुरांनी दोन वर्षे, दोन महिने आणि पाच दिवसांमध्ये बांधकाम पूर्ण केले होते. त्याचे उद्घाटन 31 मार्च 1889 मध्ये झाले आणि 6 मेपासून टॉवर जनतेसाठी खुला झाला. हा टॉवर जगभरातील पर्यटकांचे आकर्षण आहे. दरवर्षी 65 ते 70 लाख पर्यटक आयफेल टॉवरला भेट देतात. 100 वर्षांहून अधिक काळ याचा उपयोग प्रसारणासाठीही केला जात आहे. त्यामुळे आयफेलच्या शिखराची उंची बदलत राहिली आहे.