युवासेनेच्या मागणीला यश, महापरिनिर्वाणदिनी होणारी परीक्षा पुढे ढकलली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई, दि. 18 (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी म्हणजेच 6 डिसेंबरला होणारा विधी शाखेचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या विधी शाखेच्या पाचव्या सत्राची परीक्षा 29 नोव्हेंबरपासून सुरू होत असून शेवटचा पेपर 6 डिसेंबरला होणार होता, पण युवासेनेने हा पेपर पुढे ढकलण्याची मागणी केल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने 7 डिसेंबरला पेपर होणार असल्याचे जाहीर केले आहे.

बाबासाहेब आंबेडकर मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी होते. शिक्षण क्षेत्रात त्यांचा जगात नावलौकिक असताना विद्यापीठाला बाबासाहेबांचा विसर पडला असून परीक्षांचे चुकीचे नियोजन करणाऱ्या विद्यापीठाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर लाखो अनुयायी बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र याच दिवशी मुंबई विद्यापीठाने विधी शाखेच्या पाचव्या सेमिस्टरच्या पेपरचे आयोजन केले होते. ज्या महापुरुषाने या देशाचे संविधान लिहिले आहे. त्यांनाच अभिवादन करण्यासाठी कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेमुळे जाता येणार नाही. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली होती.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, माजी मंत्री – आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव – वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सहसचिव अॅड. संतोष धोत्रे, सहसचिव परशुराम तपासे यांनी सदरचा पेपर तत्काळ रद्द करण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सहानभूतीपूर्व आणि सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांना दिले होते. त्यानुसार विधी शाखेचा 6 डिसेंबर रोजी होणारा पब्लिक इंटरनॅशनल लॉ अॅण्ड हय़ूमन् राईट्स हा पेपर आता 7 डिसेंबरला होणार आहे.