चाकुर तालुक्यातील जढाळा येथे बापानेच पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथे बापाने 29 वर्षांच्या मुलाचा काठीने मारहाण करत त्यानंतर दोरीने गळा आवळून हत्या केली. या प्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिवाजी विश्वनाथ संगनगीरे (वय – 53) असे बापाचे नाव आहे. तर कृष्णा शिवाजी संगनगीरे असे मृत मुलाचे नाव आहे.
कृष्णा शिवाजी संगनगीरे हा स्वयंपाक घरात धिंगाणा घालत होता म्हणुन आरोपी आणि त्याच्यात वाद झाला. या वादात बापाने मुलाच्या कपाळावर काठी मारली, त्यामुळे तो जमिनीवर कोसळला. मृताचा भाऊ डॉक्टरला बोलावण्यासाठी गावात गेला होता तर आईं डॉक्टर येण्याची वाट पाहत दारात थांबली होती. या वेळात आरोपीने पुन्हा तो शुद्धीवर येऊन आपल्याला ठार मारेल या भीतीपोटी बेशुद्ध मुलाच्या गळ्याभोवती दोर आवळून त्याची हत्या केली. याप्रकरणी प्रथम अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलीस तपासादरम्यान व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस उप निरीक्षक गजानन तोटेवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सह पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे करत आहेत.