Kokan News – नव्या वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी; आंजर्ले येथील कडयावरील गणपती मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी !

सन २०२६ या नव्या वर्षात मंगळवारी ६ जानेवारीला पहिलाच अंगारकी चतुर्थीचा योग आला या अंगारकी चतुर्थी निमित्त दापोलीतील आंजर्ले येथील कडयावरील गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. अंगारकी चतुर्थी निमित्त दर्शनासाठी भली मोठी रांग लागलेली असतानाही श्री कडयावरील गणपती मंदिर देवस्थान व्यवस्थापनाने दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविक भक्तगणांना व्यवस्थित आणि समाधानाने दर्शन मिळावे यासाठी उत्तम व्यवस्था हाताळल्याने येथे दर्शनासाठी आलेल्या सर्वच भक्तगण भाविकांना आपल्या मनोजोगे श्रीं चे दर्शन घेता आले.

अंगारकी चतुर्थी हा मोक्षदायक दिवस मानला जातो. या दिवशी भगवान श्री गणेशाची उपासना केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेशासाठी उपवास केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद प्राप्त होतात असे भक्तगण मानतात.

अंगारकी चतुर्थी हे हिंदू धर्मातील एक तिथी व्रत आहे. ज्यावेळी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते त्यावेळी त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणले जाते. गणपती या देवतेशी संबंधित हे व्रत आहे. या व्रतात दिवसभर उपवास करतात आणि रात्री भोजन करतात. भोजनात समाविष्ट असलेल्या उकडीच्या मोदकांचा गणपतीला नैवेद्य दाखवतात. भक्तगण अंगारकी चतुर्थीचे व्रत करतांना घरोघरी गणेशाची पूजा करतात. त्याचप्रमाणे या दिवशी गणपतीच्या देवळात जाऊन लोक देवाचे दर्शन घेतात.