
उन्हाळ्याच्या सुट्टीत जाणाऱ्या चाकरमान्यांना गुड न्यूज मिळाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा 15 मेपासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला असून पोलादपूर बाजूकडील बोगद्यातील वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास झगमगीत होणार आहे. बोगद्यातील गळतीसह अंतर्गत कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
कशेडी घाट बोगदा हा दोन किलोमीटर लांबीचा असून त्याला जोडणाऱ्या रस्त्यांसह संपूर्ण मार्ग सुमारे नऊ किलोमीटरचा आहे. यामुळे 40 ते 45 मिनिटांचा वळसा वाचून अवघ्या 10 ते 15 मिनिटांत रायगडमधील पोलादपूर ते रत्नागिरीतील कशेडीपर्यंतचा प्रवास होणार आहे. मे महिन्यात गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय असते. 15 मेपासून कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू करण्यात आली. यावेळी पोलादपूर बाजूकडील लाईट सुरू करण्यात आली. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुकर झाला आहे.
गळती थांबवण्यासाठी ग्राऊंटिंगचा वापर
दोन्ही बोगद्यातील मार्गावर एकूण 200 पथदीपांची उभारणी करण्यात आली आहे. बोगद्यांतील अंतर्गत गळती दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. गळती थांबवण्यासाठी ग्राऊंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. येत्या 5 ते 6 दिवसांत रत्नागिरी बाजूकडील लाईट सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उप प्रोजेक्टर प्रबंधक अमोल शीवतरे यांनी दिली.