बॉसने सुट्टी न दिल्याने वैतागला, कर्मचाऱ्याने रचला खतरनाक कट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रजा मिळावी यासाठी कर्मचारी वेगवेगळे बहाणे शोढून काढत असतात. बॉस खडूस असेल तर कर्मचारी सुट्टीसाठी अजब कारणं देऊन सुट्टी मिळवायचा प्रयत्न करतात. अमेरिकेमध्ये एका कर्मचाऱ्याला त्याच्या बॉसने सुट्टी देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. यामुळे वैतागलेल्या कर्मचाऱ्याने एक खतरनाक कट रचला. मात्र हा कट शिजू शकला नाही आणि तो त्याच्या अंगाशी आला. या कर्मचाऱ्याचं वय 19 वर्ष असून त्याने जो कट रचला होता त्याबद्दल सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू आहे. ब्रँडन सुल्स असं या कर्मचाऱ्याचं नाव असून तो अमेरिकेतील एरिझोनाचा रहिवासी आहे.

डेली मेलने दिलेल्या बातमीत म्हटलंय की ब्रँडन सुल्स हा एरिझोना शहरातील वॉटर टॉवरजवळच्या एका टायर कारखान्यात कामाला होता. त्याला सुट्टी हवी होती, मात्र त्याचा बॉस त्याला सुट्टी देत नव्हता. सुट्टी मिळत नसल्याने ब्रँडन वैतागला होता. त्यानंतर ब्रँडन पोलिसांना रस्त्याच्या कडेला पडलेला सापडला होता. एका व्यक्तीने अनोळखी व्यक्ती रस्त्याच्या कडेला पडल्याचं पाहून पोलिसांना कळवलं होतं. पोलीस जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा ब्रँडनचे हात कमरेच्या पट्ट्याने बांधलेले होते, तोंडात बोळा कोंबण्यात आला होता. पोलिसांनी ब्रँडनला मोकळा केला आणि त्याला धीर देण्याचं काम केलं. ब्रँडनने पोलिसांना सांगितलं की त्याला दोघांनी बेशुद्ध करत त्याचं अपहरण केलं. ‘बराचवेळ फिरल्यानंतर मला अपहरणकर्त्यांनी रस्त्याच्या कडेला फेकून दिलं. माझ्या वडिलांकडे मोठं घबाड असून ते त्यांनी कुठेतरी लवपलं असल्याचा अपहरणकर्त्यांना संशय होता. या घबाडाबाबत माहिती मिळवण्यासाठी माझं अपहरण करण्यात आलं होतं’ असं ब्रँडनने पोलिसांना सांगितलं होतं.

ब्रँडन काहीतरी गडबड करत असल्याचा तो काम करत असलेल्या कंपनीतील वरिष्ठांना संशय येत होता. त्यांनी खासगी गुप्तहेर त्याच्या मागावर सोडले होते. या गुप्तहेरांनी जी माहिती आणली ती धक्कादायक होती. ब्रँडनला सुट्टी मिळत नसल्याने त्यानेच अपहरणाचा हा बनाव केला होता असं या गुप्तहेरांनी सांगितलं आहे. सीसीटीव्ही दृश्ये पाहिल्यानंतर गुप्तहेरांनी काढलेली माहिती खरी असल्याचे कंपनीतील वरिष्ठांना कळाले. यानंतर पोलिसांनी पुन्हा ब्रँडनची चौकशी केली, ज्यामध्ये त्याने आपणच अपहरणाचा बनाव रचल्याचं कबूल केलं. एबीसी न्यूज पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले आहे की ब्रँडनने स्वत:च्या तोंडात बोळा कोंबला त्यानंतर स्वतच्या पट्ट्याने हात बांधून घेतले आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांना दिसेल अशा पद्धतीने रस्त्याच्या कडेला झोपून राहिला. ब्रँडनने जेव्हा या सगळ्याची कबुली दिली तेव्हा कंपनीने त्याला थेट बाहेरचा रस्ता दाखवला.