
छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचे दैवत. मराठी स्वराज्याची स्थापना करणाऱया महाराजांनी बांधलेले किल्ले आता युनेस्को जागतिक वारसास्थळं म्हणून घोषित झाली आहेत. 17 ते 19 व्या शतकात विकसित केलेले किल्ले, त्यांची तटबंदी मराठा राजवटीचे लष्करी पराक्रम दर्शवतात. मराठय़ांचा लष्करी पराक्रम आणि वास्तुकला दर्शवणारे हे किल्ले आपला सांस्कृतिक वारसा आहेत. इतिहासात डोकावताना या गडकिल्ल्यांसोबत इतर स्थापत्यही आपल्यासमोर येते. गडकिल्ल्यांसोबत महाराष्ट्रभर व बाहेरही ऐतिहासिक कालखंडातील अगणित स्मारके, समाधीस्थाने दिसून येतात. मराठय़ांचा इतिहास किंवा मराठेशाहीचा काळ हा साधारण छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजीराव यांच्या कारकिर्दीपासून ते इंग्रजांनी आपल्या राजवटीत संस्थाने खालसा करेपर्यंतचा काळ इतका विस्तारलेला आहे. या काळातील इतिहास घडविण्यास कारणीभूत ठरलेल्या व्यक्तींची अंतिम विश्रामस्थाने म्हणजे त्यांचे समाधीस्थळ. राजकीय इतिहासाशी संबंधित अशी स्मारके व समाधीस्थळांचा वेध या सदरातून आपण घेणार आहोत. सोबतच या इतिहासाशी निगडीत नाणी, हस्तलिखीत पत्रे, शिक्के, त्या काळात रेखाटलेली व्यक्तिचित्रे यांचाही संदर्भ घेणार आहोत.






























































