
तो आला.. त्याने आठ जणांवर हल्लेही केले आणि पसार झाला. त्याला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले. झाडीझुडपे पालथी घातली. आक्षी, साखर परिसरात पाच ठिकाणी पिंजरे लावले. अगदी त्यात कोंबड्या आणि मटणाची मेजवानीही तयार ठेवली. दहा दिवसांच्या प्रयत्नानंतरही पठ्या काही हाती लागला नाही. तो नेमका गेला तरी कोठे? अशी एकच चर्चा सुरू असून त्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे. हा पठ्या दुसरा तिसरा कुणी नसून नागाव, आक्षी या भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या आहे. चिकन, मटणाला दाद देईना.. बिबट्या डिनर पार्टीला येईना अशी स्थिती झाली असून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करणारे वनखात्याचे कर्मचारीही हतबल झाले आहेत.
अलिबागजवळच्या निसर्गरम्य नागावमधील वाळंज पारोडा येथे असलेल्या खालच्या आळीत भरवस्तीमध्ये ९ डिसेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास बिबट्या घुसला आणि सर्वांचीच दाणादाण उडाली. दिवसभरात बिबट्याने सहा जणांवर हल्ला केला. बिबट्याला पकडण्यासाठी अलिबागसह रोहा व पुणे वनविभागाच्या रेस्क्यू टीम दाखल झाल्या. मात्र बिबट्याला पकडण्यात यंत्रणेला अपयश आले. यानंतर दोन दिवस तो कुणाच्याही दृष्टीस पडला नाही. यामुळे रेस्क्यू टीम परत गेल्या. नंतर १२ डिसेंबर रोजी नागावलगत असलेल्या आक्षी गावातील साखर परिसरात बिबट्या आला होता.
बिबट्याने साखर परिसरात दोन जणांवर हल्ला करत त्यांना जखमी केले. यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी अलिबाग वनविभाग व रोहा वनविभागाच्या रेस्क्यू टीमने सापळा रचत पाच पिंजरे लावले.
या पिंजऱ्यांमध्ये कोंबड्या व मटण ठेवण्यात आले. मात्र बिबट्या पिंजऱ्यात न गेल्याने त्याला पकडण्याच्या वनविभागाच्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे.
बिबट्या मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यातून आला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एवढ्या दूर वनक्षेत्रातून बिबट्या समुद्रकिनारी क्षेत्रात कसा आला हा प्रश्न अनुत्तरित आहे.






























































