
भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या खोल विहिरीत पडल्याची घटना वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजारवाडी येथे मंगळवारी सकाळी घडली. कुडाळ वनविभागाच्या पथकाने सुखरूपपणे त्या बिबट्याला बाहेर काढले.
परुळे बाजारवाडी येथील मनोहर सावळाराम सावंत यांच्या राहत्या घरालगत असणा-या विहिरीमध्ये वन्यप्राणी बिबट्या पडला असल्याचे मंगळवारी सकाळी 8.30 वा.च्या सुमारास स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले. ग्रामस्थांनी याची माहिती त्वरित वनविभागाला दिली. मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाचे पथक परूळे गावात दाखल झाले.
वनविभागाने वाघाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी दोरखंडाच्या सहाय्याने लाकडी फळी विहिरीत सोडली. त्या फळीवर बिबट्या बसून राहिला. वनविभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या बिबट्याला पिंज-याच्या सहाय्याने तब्बल 25 ते 30 फूट खोल विहिरीतून यशस्वीपणे सुखरूप बाहेर काढण्यात आले.
हा बिबट्या नर जातीचा असून अंदाजे तीन ते साडेतीन वर्षे वयाचा असल्याचे कुडाळचे पशुवैद्यकीय अधिकारी सचिन घालवडकर यांनी सांगितले. त्यांनी या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती कुडाळचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांनी दिली आहे.
भक्ष्याच्या शोधात असलेला हा बिबटा पहाटेच्या सुमारास अंदाज न आल्यामुळे विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास ही घटना आली. वनविभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्याला मोठ्या शिताफीने सुखरूप विहिरीतून बाहेर काढण्यात आले. काही दिवस परुळे परिसरात बिबट्याची दहशत होती. त्याने अनेक पाळीव प्राण्यावर हल्ले केले होते. बिबट्या विहिरीत पडल्याचे समजताच परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
सावंतवाडीचे उपवनसंरक्षक एस.डी.नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक आय.डी.जालगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे, कणकवली वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे, सरपंच श्वेता चव्हाण, उपसरपंच विजय घोलेकर, नेरूर वनपाल धु.रा.कोळेकर, मठ वनपाल अ.स.चव्हाण, वनरक्षक विष्णू नरळे आणि ग्रामस्थांच्या मदतीने स्थानिकांच्या मदतीने या बचाव कार्यात सहभाग घेत यशस्वी केले.


























































