
मंगळवारपासून सुरू होत असलेल्या ‘मलेशिया ओपन सुपर-1000’ बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडू नव्या सत्राची सुरुवात करणार आहेत. लक्ष्य सेन आणि पी. व्ही. सिंधू यांसारख्या स्टार खेळाडूंवर यावेळी मजबूत सुरुवात करण्याची जबाबदारी असेल. 2025 हे वर्ष हिंदुस्थानी खेळाडूंना फारसे अनुकूल ठरले नव्हते. दुखापती आणि खराब फॉर्ममुळे अव्वल खेळाडूंना संघर्ष करावा लागला होता.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळविल्यानंतर सातत्याने खराब फॉर्मशी झुंज देणाऱया 2021च्या जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेनने ‘ऑस्ट्रेलियन ओपन सुपर-500’ जिंकत पुन्हा लय मिळविली. तो ‘हाँगकाँग ओपन’च्या अंतिम फेरीतही पोहोचला होता. पहिल्या फेरीत सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहविरुद्ध तो हीच लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
सिंधूसाठी मागील वर्ष निराशाजनक
‘यूएस ओपन सुपर-300’ विजेता युवा आयुष शेट्टीचा पहिल्या फेरीत पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मलेशियाच्या ली जी जियाशी सामना होईल. पी. व्ही. सिंधूसाठी मागील वर्ष निराशाजनक ठरले. पायाच्या दुखापतीमुळे सिंधू ऑक्टोबरनंतर स्पर्धात्मक खेळापासून दूर होती. ती पहिल्या फेरीत चायनीज तैपेईच्या सुंग शुओ युनविरुद्ध खेळणार आहे.
दुसऱ्यांदा ‘ओडिशा ओपन’चे विजेतेपद पटकाविलेल्या उन्नती हुडाचा सामना टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आणि चौथ्या मानांकित चीनच्या चेन यू फेइशी होईल.



























































