
दिवाळी सणापूर्वीच्या शेवटच्या रविवारी मुंबई शहर आणि उपनगरांत सर्वच बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी झालेल्या गर्दीने तेजीचा लखलखाट पाहायला मिळाला. रंगीबेरंगी कंदिल, आकर्षक दिवे, नवनवीन कपडे, प्रियजनांना देण्यासाठी भेटवस्तू, विद्युत रोषणाईचे साहित्य खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली. दादर, लालबाग, परळ, अंधेरी, बोरिवली, घाटकोपर, भांडुप, मुलुंड आदी परिसरातील मार्केट गर्दीने फुलून गेले होते. या गर्दीमुळे पोलिसांना प्रमुख मार्केटच्या परिसरात बंदोबस्त वाढवावा लागला.
धारावी कुंभारवाड्यातही खरेदीसाठी मोठी लगबग
धारावीच्या कुंभारवाड्यात दिवाळी सणानिमित्त मातीच्या पणत्या बनवण्याचे काम जोरात चालते. येथील पणत्यांना मुंबईसह परिसरातून मोठय़ा प्रमाणावर मागणी असते. नागरिकांबरोबरच अन्य जिह्यांतील व्यापारीदेखील कुंभारवाड्यात पणत्या खरेदीसाठी हजेरी लावतात. रविवारच्या सुट्टीत धारावीच्या कुंभारवाडय़ात खरेदीसाठी मोठी लगबग दिसून आली. महागाईचे सावट असले तरी लोकांना आमच्या कुंभारवाडय़ात येण्यापासून स्वतःचा मोह आवरता येत नाही, अशी प्रतिक्रिया धारावीतील व्यापाऱ्यांनी दिली.
वीकेण्डचा मुहूर्त आणि पावसाने घेतलेली विश्रांती यामुळे मुंबईकरांनी मनसोक्त खरेदीचा बेत आखला. अनेकजण कुटुंबातील प्रत्येकाच्या पसंतीची खरेदी करण्यासाठी संपूर्ण कुटुंबीयांसमवेत घराबाहेर पडले होते. पारंपरिक कपडे खरेदी करण्यासाठी दादर-हिंदमाता परिसरात मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणी मुंबईच्या उपनगरांसह ठाणे, वसई-विरार आणि नवी मुंबई परिसरातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली होती. महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. मात्र दिवाळी सणाच्या उत्साहावर त्याचा परिणाम होऊ न देण्याची खबरदारी मुंबईकरांनी घेतली. त्यामुळे रांगोळी, पणत्या, इलेक्ट्रिक दिव्यांपासून ते खमंग फराळाचे साहित्य, कपडे, फटाक्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी उत्साह दाखवला. दादरचे मार्केट हे पश्चिम आणि मध्य रेल्वेमार्गावरील प्रवाशांसाठी मध्यवर्ती ठरते. त्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दादर खरेदीच्या निमित्ताने ’हाऊसफुल्ल’ झाले होते.
जागोजागी वाहतूककोंडी, रेल्वे प्रवासात खोळंबा
मार्केटमध्ये झालेल्या गर्दीने जागोजागी वाहतूककोंडी झाली होती. प्रभादेवी येथील एल्फिन्स्टन पूल बंद असल्यामुळे दादर बाजारपेठेमधील गर्दी आणि वाहतूक यांचे नियोजन करताना पोलिसांची प्रचंड दमछाक झाली. उपनगरी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील प्रवासी सेवेवर रविवारी ब्लॉकचा परिणाम झाला होता. पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक तसेच विरार ते डहाणूदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडले, तर मध्य रेल्वेचे वेळापत्रक कर्जत यार्डच्या ब्लॉकने विस्कळीत केले. त्यामुळे रेल्वे प्रवासात नागरिकांचा खोळंबा झाला.