
रायगड पोलिसांनी तस्करांची ‘नशा’ चांगलीच उतरवली आहे. एमडी, केटामाईन, चरस, गांजा तसेच मेफेड्रोनची तस्करी करणाऱ्या ३२ जणांना पोलिसांनी गेल्या वर्षभरात अटक केली आहे. त्यांच्याकडून ९४ कोटी ४५ लाख रुपयांचा ‘माल’ जप्त केला असल्यामुळे नशेखोर व तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्तपणे अमली पदार्थांविरुद्धची मोहीम राबवली. रायगड पोलिसांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान एकूण २६ गुन्हे दाखल केले आहेत. त्यात ३२ आरोपींना अटक करण्यात आली. या कालावधीत रायगड पोलिसांनी ५० किल ो ६८७ ग्रॅम केटामाईन हा अमली पदार्थ जप्त केला असून जप्त केटामाईनची किंमत ८८ कोटी ९२ लाख २५ हजार इतकी आहे. मागील वर्षभरात पोलिसांनी ४ कोटी २२ लाख ७६ हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. दरम्यान, ९० टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
कारवाईचा लेखाजोखा
केटामाईन : ५० किलो ६८७ ग्रॅम : ८८ कोटी ९२ लाख २५ हजार
एम.डी.: ४ किलो ७६ ग्रॅम : ४ कोटी २२ लाख ७६ हजार
चरस : २३ किलो ८९० ग्रॅम : १ कोटी १९ लाख ४५ हजार
गांजा : ४४ किलो ४३१ ग्रॅम : ११ लाख ३२ हजार ७७५ रुपये




























































