रेल्वेच्या हेरिटेज गल्लीत कचऱयाचे साम्राज्य!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक वारसा स्थळाच्या यादीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला लागून मध्य रेल्वेने हेरिटेज गल्ली विकसित केली आहे. त्यामध्ये ब्रिटिशकालीन वाफेवर चालणारी क्रेन, रेल्वेचे पहिले इलेक्ट्रिक इंजिन, हॅण्डटय़ुब फायर अशा अनेक जुन्या वस्तू पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवल्या आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने या हेरिटेज गल्लीकडेच पुरते दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हेरिटेज गल्ली आता कचरा गल्ली बनली आहे. त्यामुळे ऐतिहासिक मशिनरी पाहायला येणाऱया पर्यटकांची दुर्गंधीमुळे कुचंबणा होत आहे.

रेल्वेला पावणेदोनशे वर्षांचा इतिहास असून 1853 मध्ये बोरीबंदर ते ठाणे अशी देशातील पहिली रेल्वे धावली होती. यावेळी वापरण्यात आलेले इंजिन, प्रिंटिंग मशीन, वाफेवर चालणारी क्रेन अशा अनेक वस्तू ठेवल्या आहेत. मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक 18 ला लागून असलेल्या या ऐतिहासिक वारशाबाबत मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे बाजूलाच असलेल्या रेस्टॉरंट व्हीलबरोबरच इतर ठिकाणाहून येणारा कचार हेरिटेज गल्लीसमोर टाकला जात आहे. त्यामुळे येथील ऐतिहासिक मशीन, यंत्रसामग्री पाहण्यासाठी येणाऱया पर्यटकांची कुचंबणा होत असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

हेरिटेज गल्लीचे अस्तित्व धोक्यात

रेल्वेच्या दृष्टीने ऐतिहासिक वारसा असलेल्या या हेरिटेज गल्लीचे सध्या अस्तित्व धोक्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी हेरिटेज गल्लीत असलेल्या ऐतिहासिक यंत्रसामग्री लोणावळा येथे हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे या गल्लीचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. येथे ऐतिहासिक यंत्रसामग्री नसेल तर पर्यटक काय पाहणार, असा प्रश्न उभा राहणार आहे.