
कोरोना झाल्यानंतर रक्ताचीही नाती दुरावल्याच्या घटना घडल्या. कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करायलाही कुणी नातेवाईक पुढे धजावत नाहीत. अशा वेळी रत्नागिरीतील ‘संपर्क युनिक फाऊंडेशन’ ही स्वयंसेवी संस्था पुढे आली आहे.
संस्थेत कार्यरत असलेल्या मुस्लिम बांधवांनी हिंदू धर्मातील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करत सामाजिक सलोखा निर्माण केला. या संस्थेचे कार्यकर्ते दररोज कोरोना रुग्णांबरोबरच नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असतात. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना औषधे, जीवनावश्यक वस्तू घरपोच नेऊन देणे, लसीकरण पेंद्रावर स्वयंसेवक म्हणून काम करणे, रत्नागिरीतील महिला रुग्णालयातील कोविड सेंटरमधील रुग्णांशी दिवसातून दोन वेळा संवाद साधून त्यांचे आत्मबल वाढविण्याचे कार्य संस्थेने केले आहे. संस्थेच्या या उपक्रमात शकील गवाणकर, जमीर खलफे, दिलीप रेडकर, नाझीम मजगावकर, रूपेश चव्हाण, युसूफ शिरगांवकर, इस्माईल नाकाडे, इरफान शहा, फातिमा नाकाडे, फैसल सरदार, सवद कापडी, शोएब बंदरकर, गुरुप्रसाद आणि निकिता कांबळे हे स्वयंसेवक कार्यरत आहेत.





























































