धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कात सार्वजनिक सुट्टीची मागणी येत नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कात सार्वजनिक सुट्टीची मागणी समाविष्ट नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की, संविधानाच्या अनुच्छेद 25 अंतर्गत हमी दिलेल्या धर्म स्वातंत्र्यात धार्मिक प्रसंगासाठी देशव्यापी सुट्टीची मागणी करण्याचा अधिकार येत नाही. सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे हा पूर्णपणे सरकारच्या धोरणात्मक अधिकार क्षेत्रातील विषय आहे. गुरू गोविंद सिंग यांची जयंती अर्थात प्रकाश पर्व देशभरात राजपत्रित सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करण्याची मागणी न्यायालयाने पूर्णपणे फेटाळली. एक विकसनशील राष्ट्र म्हणून हिंदुस्थानने उत्पादकता व कामकाजातील सातत्य यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्यावरही न्यायालयाने जोर दिला.

न्यायालयाने शीख धर्माच्या तत्त्वांबाबतही गौरवपूर्ण उल्लेख केला. शीख धर्म स्मरण, प्रामाणिक श्रम आणि निःस्वार्थ सेवेवर भर देतो, असे सांगताना न्यायमूर्तींनी गुरू गोविंद सिंग यांच्या जीवनाला धैर्य, शिस्त आणि कर्तव्याप्रति निष्ठsचे उत्तम उदाहरण म्हटले. त्यांच्या जीवनाचा अर्थ न्यायासाठी आणि ऐहिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी केलेला सततचा संघर्ष असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. गुरू गोविंद सिंग यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या अगाध आदरात न्यायालयाने असेही नमूद केले की, केवळ आदरांजली देऊन प्रतीकात्मक सन्मान दाखवण्यापेक्षा समाज व राष्ट्राप्रति निष्ठsने कर्तव्ये पार पाडणे हाच त्यांच्या वारशाचा खरा सन्मान आहे.