
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व नियोजनबद्धरीत्या पार पाडण्यासाठी सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी शहरात एकूण 26 प्रभाग निश्चित करण्यात आले असून, 1091 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
निवडणूक रिंगणात एकूण 564 उमेदवार असून, शहरातील एकूण 9 लाख 24 हजार 706 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्था दृष्टीने 46 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त व विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
निवडणूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने 7 निवडणूक निर्णय अधिकारी, 7 ठिकाणी ईव्हीएम मशीनचे वितरण, स्ट्राँग रूम तसेच मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निप्रतिबंधक व्यवस्था व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. निवडणुकीसाठी एकूण 1365 कंट्रोल युनिट व 3494 बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मतदान व मतमोजणी प्रक्रियेबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱयांसाठी तीन टप्प्यांत प्रशिक्षण घेण्यात आले आहे. मतदारांमध्ये जनजागृती वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने बचत गट, शाळा व महाविद्यालयांच्या माध्यमातून निबंध स्पर्धा, वत्तृत्व स्पर्धा, मतदार शपथ कार्यक्रम, पथनाटय़ तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी हार्ंडग्ज लावून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी 7 खर्च तपासणी पथकांची नियुक्ती केली असून, उमेदवारांच्या खर्चावर काटेकोर नजर ठेवण्यात येत आहे.
2741 पोलिसांचा बंदोबस्त तैनात
कायदा व सुव्यवस्था व सुरक्षिततेसाठी एकूण 2741 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, त्यामध्ये 151 पोलीस अधिकारी, 1680 पोलीस हवालदार, तसेच एसआरपीएफच्या 2 कंपन्यांचा समावेश आहे. महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या या सर्व नियोजनामुळे सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक ही शांततापूर्ण, निर्भय व यशस्वीरीत्या पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


























































