केंद्राने पुरवठाच केला नाही; राज्यात फक्त दोन लाख मेट्रिक टन युरिया साठा

केंद्र सरकारने युरिया खताचा पुरवठा केला नाही. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगामात महाराष्ट्रात युरियाचा तुटवडा जाणवू लागला आहे. सध्याच्या घडीला राज्यात फक्त 2.36 लाख मेट्रिक टन इतकाच साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे कृषी खात्याच्या अधिकाऱयांचे धाबे दणाणले आहेत. शेतकरी हवालदिल झाले असून राज्य सरकारने युरियाच्या पुरवठ्यासाठी केंद्राला साकडे घातले आहे.

राज्याला एप्रिल ते जुलै या कालावधीत केंद्र सरकारकडून 10.67 लाख मेट्रिक टन युरियाचे वाटप होणे अपेक्षित होते, मात्र एकूण युरिया खतापैकी फक्त 79 टक्के म्हणजे 8.41 लाख मेट्रिक टन युरियाचा पुरवठा करण्यात आला. ऑगस्ट महिन्यात तर 2.79 लाख मेट्रिक टन वाटपातील केवळ 96 लाख मेट्रिक टन पुरवठा मिळाला आहे. महाराष्ट्रात 2025 रब्बी हंगामासाठी युरियाचा तुटवडा भासू नये व शेतकऱयांना योग्य वेळेत पीक उत्पादनासाठी युरिया मिळावा यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्रीय रसायन आणि खत मंत्री जे. पी.नड्डा यांना पत्र पाठवले असून राज्याला तातडीने युरियाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.