हॉस्टेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न जीवावर बेतला; दहावीचा विद्यार्थी नदीत वाहून गेला!

हॉस्टेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न एका दहावीच्या विद्यार्थ्याच्या जीवावर बेतला आहे. नदी पार करुन पळून जाण्याच्या प्रयत्नात एक विद्यार्थी नदीच्या प्रवाहात वाहून गेला आहे. रांचीमध्ये काल मध्यरात्री ही घटना घडली. एनडीआरएफकडून वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा शोध सुरु आहे.

‘आज तक’ने दिलेल्या माहितीनुसार, सदर पोलीस ठाण्याअंतर्गत जुमर पूलजवळ एका खासगी शाळेच्या हॉस्टेलमधील पाच विद्यार्थ्यांनी काल मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हॉस्टेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाचही जण हॉस्टेलमधून निघाले आणि जुमार नदी पार करत होते. यावेळी एक विद्यार्थी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. अन्य चार मित्रांनी अंधारात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कुठेही दिसला नाही.

अखेर चारही विद्यार्थी हॉस्टेलमध्ये परतले आणि हॉस्टेल प्रशासनाला याची माहिती दिली. यानंतर पोलीस आणि एनडीआरएफला याची माहिती देण्यात आली. एनडीआरएफकडून बेपत्ता विद्यार्थ्याचा शोध सुरु आहे.