
हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर तणाव असतानाच हिंदुस्थानचा आणखी एक उपग्रह अंतराळात झेपावणार आहे. हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) 18 मे रोजी ईओएस-09 (आरआयसैट-1बी) रडार इमेजिंग उपग्रहाला सूर्याच्या समकालिक कक्षेत नेणारा पीएसएलव्ही-सी61 मिशन लाँच करणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हा उपग्रह अंतराळात सोडण्यात येणार असून पहाटे 6.59 वाजता ते प्रक्षेपण होणार आहे.
ईओएस-09 अत्याधुनिक सी-बँड सिंथेटिक अपर्चर रडारने सुसज्ज आहे. त्यामुळे विपरीत वातावरण असले तरी पृथ्वीच्या पृष्ठभागावरचे अत्यंत उच्च रिझोल्युशनमधील फोटो मिळवता येऊ शकतात. हिंदुस्थान आणि पाकिस्तानच नव्हे तर चीनलगतच्या संवेदनशील सीमाभागांवरही बारीक लक्ष ठेवता येणार आहे. त्याचबरोबर सागरी किनारपट्टीवरही सातत्याने देखरेख ठेवणे सहज शक्य होणार आहे.