
आज चैत्री कामदा एकादशीचा मुख्य सोहळा लाखो वैष्णव भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा होतो आहे. अवघी पंढरी नगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेलेली पाहायला मिळते. उन्हाचा असह्य तडाखा बसत असताना देखील वारकऱ्यांच्या भक्तीचा उत्साह काही कमी दिसत नाही. दरम्यान आज एकादशी असली तरी श्री विठ्ठल रखुमाईला फराळाचा नैवैद्य न दाखविता चक्क पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला आहे तथापि वारकरी भाविक मात्र फराळ करतात.
चैत्री एकादशीच्या नैवेद्याची रंजक अशी पुरातन कथा आहे. तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे श्री महादेव व पार्वतीचा विवाह होता या विवाहाला श्री विठ्ठल रखमाई उपस्थित होते. विवाहानंतर झालेल्या भोजनात श्री विठ्ठल रखुमाई यांनी एकादशी असताना देखील उपवास मोडून पुरणपोळी खाल्ल्याची आख्यायिका आहे. या संदर्भाने पुराणात याचा उल्लेख आहे हजारो वर्षाची ही परंपरा आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराकडून जपली जात आहे.
आजच्या या चैत्री वारी एकादशीचे औचित्य साधून दोन लाखाहून अधिक वारकरी भाविकांनी चंद्रभागेचे स्नान व नगरप्रदक्षिणा पूर्ण करुन पिढीजात वारी पूर्ण केली. दरम्यान श्री विठुराया व रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेत हजारो भाविक उभे असून ही रांग रिद्धी-सिद्धी पत्राशेडपर्यंत पोहोचली आहे. दर्शन रांगेतील भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा मंदिर समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे. याशिवाय दर्शन रांगेतील एक ही भाविक उपाशी राहू नये म्हणून पत्रा शेड येथे साबुदाण्याची खिचडी, मिनरल वॉटर, सकाळी चहा, दुपारी लिंबू सरबत व सायंकाळी पुन्हा चहा मोफत वाटप करण्यात येत आहे.
दर्शन रांगेत चांगली स्वच्छता पायाला खडी टोचू नये म्हणून मॅट, शौचालय, दर्शन द्रुत गतीने चालून भाविकांचे जलद व सुलभ दर्शन होण्यासाठी अनुभवी कमांडोची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.




























































