
मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱया महाविद्यालयांना तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. ही बहुतांश महाविद्यालये कोकणातील आहेत. त्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी विद्यापीठातील युवा सेनेच्या सिनेट सदस्यांकडून केली जात आहे. तो पाहणी अहवाल विद्यापीठाला सादर करून या महाविद्यालयांना लवकरात लवकर मदत दिली जाणार आहे.
तीन टप्प्यांमध्ये या महाविद्यालयांची पाहणी केली जाणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांतील पाच महाविद्यालयांची पाहणी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर आणि महादेव जगताप यांनी केली. त्यात देवगडचे एस. एच. केळकर महाविद्यालय, रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालय, दापोली अर्बन बँक महाविद्यालय, संगमेश्वरचे इंदिरा फार्मसी महाविद्यालय आणि श्रीवर्धनचे गो. ए. सो. महाविद्यालय यांचा समावेश आहे. या महाविद्यालयांच्या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन तसेच तहसीलदारांच्या पंचनाम्याची कागदपत्रे तपासून त्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना देण्यात आली.




























































