
सामना प्रतिनिधी । मुंबई
गेल्या किमान पाच वर्षांपासून रखडलेल्या ट्रॉम्बे ते परळ या दोन भूमिगत जलबोगद्यांच्या प्रकल्पाला अखेर मुहूर्त मिळाला. विविध परवानग्यांमुळे रखडलेल्या या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. बीएआरसीच्या परवानग्या आणि अटींची पूर्तता केल्यानंतर आता या कामाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत परळ ते ट्रॉम्बेपर्यंतच्या रहिवाशांचा पाणीप्रश्न मिटणार आहे.
मुंबईकरांचा पाणीप्रश्न कायमचा मिटवण्यासाठी पालिकेने मुंबईत अनेक ठिकाणी जलबोगदे तयार करण्याचे प्रकल्प आखले आहेत. त्यापैकी परळ ते ट्रॉम्बे परिसरात दोन भूमिगत जलबोगदे बांधण्यात येणार आहेत. वडाळा ते परळ या परिसरातील जलबोगद्यासाठी एमएमआरडीएचीही परवानगी घ्यावी लागली आहे, तर चेंबूर परिसरात बेस्टने काही जागा जलबोगद्यासाठी दिली आहे.
बीएआरसीच्या अटींमुळे वेळ आणि खर्च वाढला
बीएआरसीने सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक अटी घातल्या होत्या. जमिनीच्या १०० मीटर खाली जलबोगदा खणावा, जलबोगद्याला स्टीलचे आवरण हवे या अटींबरोबरच जलबोगद्यासाठी सुरुंगस्फोट करण्यासही बीएआरसीने मनाई केली आहे. त्यामुळे अक्षरशः मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वापरून जमीन खणावी लागणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा वेळ आणि काही प्रमाणात खर्च वाढला आहे. पालिका या दोन बोगद्यांसाठी १९०० कोटी खर्च करणार आहे. स्टीलच्या आवरणामुळे प्रोजेक्टचा खर्च ५० कोटींनी वाढणार आहे, तर खणण्यासाठी दोन वर्षे लागणार असल्यामुळे हा बोगदा पूर्ण व्हायला सहा वर्षे लागणार आहेत.
यांना होणार फायदा
परळ ते ट्रॉम्बे या संपूर्ण जलबोगद्यामुळे जुन्या जीर्ण वाहिन्या जाणार आहेत. परळ ते चेंबूर, वडाळा, शिवडी, सायन, गोवंडी, ट्रॉम्बे या परिसरातील लोकांना सुरळीत व धोधो पाणीपुरवठा होणार आहे. ट्रॉम्बे येथील टेकडीवरच्या झोपडपट्टय़ांनाही पुरेसे पाणी मिळणार असून पुढील १०० वर्षांसाठी पाणीगळती आणि दूषितीकरणाची समस्या मिटणार आहे.
असे आहेत जलबोगदे
- अमरमहल- वडाळा –परळ– खर्च – ११२५ कोटी, ९.७ किमी लांब आणि २.५ मीटर व्यास, हेडगेवार उद्यान (अमरमहल)- प्रतीक्षानगर-वडाळा ते सदाकांत ढवण उद्यान (परळ)
- अमरमहल – ट्रॉम्बे, हेडगेवार
उद्यान ते ट्रॉम्बे, लांबी ५.५ किमी आणि २.५ मीटर व्यास,
खर्च – ७५० कोटी




























































