नाटकाचा ‘खेळ’ खंडोबा…सरकारी एसओपीबद्दल नाट्यकर्मींमध्ये नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील नाट्यगृहे अटीशर्तींसह सुरू करण्यास 5 नोव्हेंबरपासून म्हणजेच मराठी रंगभूमी दिनापासून परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वं नियमावली (एसओपी) नुकतीच जाहीर झाली आहे. मात्र या एसओपीबाबत नाट्यपरिषद आणि घटक संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारी एसओपी ही नाट्यगृहे सुरू करण्याबाबत असून ती नाट्य व्यवसाय उभा करणारी नाही, अशी टीका नाट्यकर्मींनी केली आहे.

एसओपीमध्ये अनेक बाबतीत स्पष्टता नाही. त्यामुळे त्यातील त्रुटी दूर करून सुधारित एसओपी जारी करण्याची मागणी नाट्यपरिषदेने केली आहे.

‘मिशन बिगिन’ अंतर्गत सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून नाटक पुन्हा सुरू करण्यासाठी  सांस्कृतिक खात्याने जारी केलेल्या एसओपीच्या पार्श्वभूमीवर नाट्यपरिषदेने आज पत्रकार परिषद घेतली. एसओपी तयार करताना त्याचे साईड इफेक्ट लक्षात घेण्यात आले नाहीत, अशी नाराजी व्यक्त करत 50 टक्के प्रेक्षक संख्येमुळे होणाऱ्य़ा नुकसानाची भरपाई शासनाने देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी म्हणाले, नाट्यगृहांचे व्यवस्थापन आणि नाट्य व्यवसाय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नाटक सुरू करताना या दोघांच्या जबाबदाऱ्य़ा  निश्चित करणे आवश्यक आहे. नाट्यगृह, सेट्स यांचे  सॅनिटायजेशन आणि  धूम्र फवारणीचा अतिरिक्त खर्च होणार आहे. तो नेमका कुणी करायची?  ती जबाबदारी कोणाची? नाटयगृहांमध्ये सहा फूटाचे अंतर, कमी प्रेक्षक क्षमता, प्रत्येकाच्या तपासणीमध्ये जाणारा वेळ, प्रयोग संख्येत घट अशा अनेक नियमावलींमध्ये अधिक स्पष्टता आवश्यक असल्याचे मत कांबळी यांनी मांडले.

नियमावली करताना निर्माते, व्यवस्थापक आदी घटकांना एकत्र बसवून विचारविनिमय होणे गरजेचे आहे, असे प्रवक्ते मंगेश कदम म्हणाले. तर नाट्य व्यवसाय उदात्त हेतूने नव्हे तर कर्तव्यभावाने सरकारने सुरू करावा. निदान सरकारच्या मालकीच्या नाटयगृहांमध्ये रोज एक प्रयोग कसा होणार, यादृष्टीने  सरकारने विचार करणे गरजेचे आहे, असे मत ज्ञानेश महाराव यांनी व्यक्त केले.

यावेळी नाट्यनिर्माता संघाचे अध्यक्ष संतोष काणेकर यांनी निर्मात्यांच्या अडचणी सांगून शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

नाट्य परिषदेतर्फे रंगमंच कामगार, व्यवस्थापक, कलाकार संघ, तसेच हौशी रंगभूमीच्या संस्था यांना आज मदतनिधी वाटप करण्यात आले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 180 हौशी संस्थांना मदत करण्यात येत आहे. रंगमंच कामगार, व्यवस्थापक अशा 832 जणांना आज सुमारे 31लाख 58 हजारांची मदत केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नाट्यपरिषदेच्या मागण्या

1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत व्यावसायिक नाटकासाठी पाच हजार रुपये नाट्यगृहाचे भाडे आकारावे, तर हौशी, प्रायोगिक, बालनाटय़ासाठी दोन हजार रुपये भाडे आकारावे.

नाट्य व्यवसाय उभा राहण्यासाठी आर्थिक पॅकेज दयावे. प्रेक्षक संख्येच्या मर्यादेमुळे होणारे निर्मात्यांचे नुकसान लक्षात घेता अनुदान धोरणाचा फेरविचार करावा.

मालमत्ता कर, वीज बिल माफ; कलावंत, रंगमंच कामगार, तंत्रज्ञ आदींना रेल्वे प्रवासाचा क्युआर कोड मिळावा.

शासनाचा एसओपी काय?

नाट्यगृहांची नियमित स्वच्छता,  निर्जंतुकीकरण, धूम्र फवारणी यासाठी नाट्यगृह व्यवस्थापनांनी उपाययोजना करावी.

प्रत्येक वापरापूर्वी आणि वापरानंतर सर्व ध्वनी व प्रकाश योजनेच्या सामग्रीचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

प्रेक्षागाराबाहेर, सामाईक क्षेत्रांमध्ये आणि प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये किमान सहा फूट इतके सुरक्षित अंतर

आरोग्य सेतू अॅप  इन्स्टॉल करून  ते दिवसभर सुरू ठेवावे.

प्रत्येक प्रवेशद्वारावर तापमान तपासणी, सॅनिटायजेश व्यवस्था.

नाट्यगृहांत फक्त 50 टक्के प्रेक्षक क्षमता

प्रेक्षागारात सुरक्षित अंतर राखून आसनव्यवस्था, तिकीट आरक्षणाच्या वेळी जी आसने वापरायची नाहीत, त्यावर आसनांचा वापर करू नये अशी स्पष्ट खूण. (फित लावावी किंवा फ्लोरोसेंट मार्करची खूण)

तिकीट खरेदी दिवसभरासाठी सुरू ठेवण्यात येईल. गर्दी टाळण्यासाठी आगाऊ तिकीट आरक्षण उपलब्ध करून द्यावे.

नाट्यगृहांतील एसीचे तापमान 24 ते 30 अंश सेल्सियस या मर्यादेत असावे.

खाद्यपदार्थ मागवण्यासाठी शक्य तितके थिएटर अॅप, क्यूआर कोडचा वापर करण्यास प्रेक्षकांना प्रोत्साहित करणे.