
कोरोनाच्या महामारीत गेले 15 महिने महाराष्ट्रातील व्यावसायिक नाटकांचे प्रयोग बंद आहेत. त्यामुळे रंगमंच कामगारांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रोजगार हिरावला गेल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने रंगमंच कामगारांना दरमहा पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी रंगमंच कामगार संघाने केली आहे.
रंगमंच कामगार संघाच्या कार्यकारिणीची बैठक काल झाली. रंगमंच कामगारांना दर महिन्याला पाच हजारांचे आर्थिक सहाय्य करावे. त्याचबरोबर सरकारने राज्यातील सर्व नाटय़गृहे एकाचवेळी सुरू करावीत. दोन्ही मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात कोणताही नाटय़प्रयोग रंगमंच कामगार करणार नाहीत, असा ठराव कार्यकारिणीत एकमताने मंजूर करण्यात आला.




























































