मराठी नाटकांची चर्चा तर आता व्हायलाच हवी!!

“चर्चा तर होणारच.” मराठी रंगभूमीवरील नवीन नाटक. सध्या वेगवेगळे विष, आशय, कलावंत, लेखक यांच्या कलाविष्काराने आपली रंगभूमी बहरते आहे..

दोन अडीच वर्षांचा वनवास सोसून मराठी नाट्यसृष्टी पुन्हा बहरू लागली आहे.. नाट्यकलावंतानी तर आता अगदी कंबर कसली आहे.. नवनवीन नाटके लिहिण्यासाठी.. दिग्दर्शित करण्यासाठी.. अभिनित करण्यासाठी.. रंगभूमीवर आणण्यासाठी.. नव्या उमेदीच्या गुणी कलावंतांकडून नव्या विषयांची नाटके लिहिली जात आहेत.. जुनी, अजरामर नाटके नव्या दमाने पुनरुज्जीवित केली जात आहेत.. नवे नवे कलाकार रंगभूमीच्या ओढीने नाटकात कामे करायला उत्सुक आहेत. या नवीन कलाकारांच्या उत्साहाने.. जुन्या कलाकारांच्या अनुभवाने मराठी रंगभूमी वेगळ्याच ग्लॅमरने झळाळते आहे. नवी – जुनी नाटके, नवे – जुने विषय , नवे – जुने कलाकार असे सध्या सुंदर दिवस मराठी नाट्यसृष्टी अनुभवते आहे..

“चर्चा तर होणारच!” सध्या रंगभूमीवर आलेले नवे नाटक. नव्या दमाचे लेखक, दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर.. आणि कसलेले मुरब्बी कलाकार याचे उत्कृष्ट मिश्रण म्हणजे हे नाटक. या नाटकाच्या निमित्ताने लेखकाने नास्तिक.. आस्तिक वाद, कम्युनिझम, मानवतावाद, जातीयवाद, वेश्यांचे प्रश्न आणि सर्व सामाजिक समस्यांवर यथाशक्ती भाष्य केले आहे.. with विनोदाची फोडणी. एका सामाजिक संस्थेतर्फे घेतल्या गेलेल्या स्पर्धेत अंतिम दोन स्पर्धकांची निवड केली जाते. दोघेही सामाजिक कार्यकर्ते.. पण विचार करण्याची आणि पर्यायाने काम करण्याची पद्धत दोघांची निराळी.. पण आपल्या कामाबद्दल.. समाजाप्रती दोघांना वाटणारी आत्मीयता, तळमळ मात्र तितकीच सच्ची.. आणि सारखी.. लोणावळ्याच्या एका रिसाॅर्टमध्ये अंतिम फेरीसाठी दोघांना बोलावले जाते.. मिळणाऱ्या बक्षिसाच्या घसघशीत रकमेतून दोघांचे बरेच प्रश्न सुटणार असतात.. या दोघांवर नेमला जातो एक परीक्षक. आणि सुरु होते आस्तिक – नास्तीकतेचे एक धम्माल नाट्य!

तीन कलाकारांमध्ये हे नाटक फिरते. बाकी पात्रे संवादांमधून येतात. मृणाल- अदिती सारंगधर, सत्यशील- आस्ताद काळे, देशपांडे- क्षितीज झारापकर. ही तीन पात्रे साकारणाऱ्या अत्यंत गुणी कलावंतांविषयी सविस्तर सांगण्यापूर्वी एका गोष्टीचा उल्लेख येथे केल्याशिवाय मला पुढे जाताच येणार नाही. या नाटकाचा मी पाहत असलेला हा दुसरा प्रयोग होता. हे संपूर्ण नाटक पार्ल्यातील दिनानाथ नाट्यगृहात केवळ जनरेटरवर सादर केले गेले. कारण संपूर्ण परिसरातील दिवे गेले होते. वातानुकुलन व्यवस्था पूर्ण बंद होती. पण कलाकारांचा उत्साह जराही कमी झाला नव्हता. प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका अत्यंत चोख पार पाडली.. आणि प्रेक्षकांनीही त्यांना मन:पूर्वक साथ दिली.

आता कलाकारांविषयी बोलायचे झाले तर प्रत्येकानेच आपली भूमिका समरसून केली आहे. यामध्ये विशेष कौतुक करावे लागेल, अदिती सारंगधरचे. अत्यंत नास्तिक, कट्टर डाव्या विचारसरणीची मृणाल अदितीने प्रचंड उर्जेने साकारली आहे. संपूर्ण नाटकात अदितीची भूमिका अत्यंत वेगवान आणि प्रचंड देहबोली दाखविणारी आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे अदिती यात कुठेही कमी पडत नाही. समाजातील दांभिक खोटेपणावर ती सणसणीत आसूड ओढते, समाजाच्या भाबड्या देवभोळेपणावर तळमळून टीका करते.. आपल्यासारख्याच असंख्य बाया याच देवभोळेपणातून वेश्या होताना हतबुद्ध होऊन पाहत राहते.. चरफडते.. तळमळते.. आणि शेवटी अगदी कडकलक्ष्मी होऊन प्रत्येक खोटेपणाचा हातात आसूड घेऊन समाचार घेत राहते. अदितीने या भूमिकेला मनापासून न्याय दिला आहे.. तिने घातलेला लाल कुर्ता तिच्यातील साम्यवादाला पूरक ठरतो. येथे समर्पक वेशभूषेसाठी मंगल केंकरेंचे विशेष कौतुक.


सत्यशील.,. अर्थात आस्ताद काळे. अत्यंत रुबाबदार, देखणा आस्ताद एका वेगळ्याच देहबोलीतून सत्यशील होऊन तो आपल्यासमोर प्रकटतो. देवाधर्मावरील पुस्तकांचा त्याचा प्रिंटींग प्रेस. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून तो वृद्धाश्रम चालवतो. मराठी साहित्य, हिंदुस्थानी संस्कृती यावर त्याचे ठाम विचार मृणालच्या कडाडणाऱ्या विजेपुढे फिके पडत जातात.. वैचारिक विरोध जरी तो करत असला तरी मृणालपुढे नेहमीच त्याने नमते घेणे आस्तादने अगदी हुबेहूब रंगवले आहे.. त्याच्या प्रत्यक्ष व्यक्तिमत्वाच्या विरोधात जाऊन. मनातून तिच्याविषयी वाटणारी प्रीतीभावना त्याने अनेक वर्षे तिच्या भावाच्या लुटुपुटीच्या दंडेलीपुढे दडपून ठेवली आहे, याखेरीज सत्यशीलचे बुजरेपण, बावरलेपण तरीही वादासाठी वाद घालणे या साऱ्या अभिनयाच्या छटा आस्तादने तोडीसतोड साकारल्या आहेत. मुख्य म्हणजे स्वत: तितक्याच तोडीचा कलावंत असतानाही वेळप्रसंगी त्याने अदितीला स्वत:च्या सहज पुढे जाऊ दिले आहे.. येथे आस्तादच्या व्यक्तिमत्वातील दिलदारपणा जाणवतो.

या दोघांचेही परीक्षण करणारी महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे देशपांडे, अर्थात क्षितीज झारापकर. स्वत: सच्चे आणि निस्सीम रंगभूमीचे चाहते.. दिलदार नाट्यसमीक्षक.. गुणी अभिनेते.. या मनस्वी कलाकाराची पार्श्वभूमी सांगायची तर अमेरिकेत उच्चशिक्षित होऊन तिथली सुखाची नोकरी सोडून मीना नेरुरकरांच्या कल्पनेतून आणि कविवर्य वसंत बापटांच्या लेखणीतून साकारलेल्या “सुंदरा मनामध्ये भरली” या नितांतसुंदर कार्यक्रमातून रंगभूमीवर पदार्पण केले आणि कायमस्वरूपी रंगभूमीचेच झाले. दैनिक सामनासाठी आणि माझ्यासाठी त्यांचे योगदान खूप खूप महत्वाचे.. आमच्या फुलोरा पुरवणीसाठी माझ्या शब्दाला मान देऊन वर्षभर त्यांनी अगदी मन:पूर्वक स्तंभलेखन केले. तसेच माझे नाटकाचे पानही दर आठवड्याच्या त्यांच्या दिलदार नाट्यसमीक्षेने दर गुरुवारी सजत राहिले. योगायोग असा की एवढी वर्षे माझ्यासाठी नाट्यसमीक्षण लिहिणाऱ्या क्षितिजच्या नाटकातील भूमिकेचे आज मी परीक्षण करायला बसले आहे. अतिशय संयत अभिनय, त्याला मिश्कीलपणाची जोड, व्यासपीठावर अगदी सहज वावर, तीच सहजता अभिनयातही येत राहते. क्षितीजनी साकारलेले देशपांडे हे पात्र सुरुवातीला मिश्कील टीकाटिप्पणी करीत एका वेगळ्याच वळणावर येऊन उभे राहते. अशा व्यक्तिरेखेसाठी आपण किती अचूक आहोत हे क्षितीजनी या नाटकात दाखवून दिले आहे.

दिग्दर्शक म्हणून लेखक हेमंत एदलाबादकर आपली भूमिका अगदी चोख पार पाडतात. भवतालच्या सद्य स्थितीवर नर्म विनोद  करत त्यांचा हात धरून नाटक पुढे सरकते. आणि प्रेक्षकांच्या मनात घर करते.

नाटकाच्या नेपथ्यासाठी संदेश बेंद्रे यांचे कौतुक. पण स्वयंपाकघरातील उठाठेवी प्रेक्षकानाही दिसल्या असत्या तर अजून मौज आली असती. कलाकारांची रंगभूषाही उत्तम आणि समर्पक ठरली आहे. अमोघ फडकेंची प्रकाश योजना प्रभावी ठरते. राहुल रानडेंनी संगीताचा अचूक वापर करत नाटकाचा प्रत्येक प्रसंग ठळक केला आहे.

एकंदरीत खरोखरच चर्चा करता करता अंतर्मुख करणारे नाटक प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरेल यात शंका नाही.

नाटक – चर्चा तर होणारच.

निर्मिती – रंगनील, वेद प्रोडक्शन्स आणि आर्या व्हिजन 

निर्माते – कल्पना कोठारी, विनय अलगेरी 

संगीत – राहुल रानडे 

प्रकाश – अमोघ फडके 

नेपथ्य – संदेश बेंद्रे 

वेशभूषा – मंगल केंकरे 

लेखक, दिग्दर्शक – हेमंत एदलाबादकर 

कलाकार – आस्ताद काळे, क्षितीज झारापकर आणि अदिती सारंगधर 

दर्जा – ***