एकनाथ खडसेंच्या मुक्ताई बंगल्यात चोरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातल्या शिवरामनगर भागात असलेल्या बंगल्यातून चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

एकनाथ खडसे यांच्या मालकीचा जळगाव शहरातल्या शिवरामनगर या भागात मुक्ताई नावाचा बंगला आहे. याच बंगल्यात चोरटय़ांनी डल्ला मारल्याची माहिती आज सकाळी समोर आल्याने खळबळ उडाली.  एकनाथ खडसे अथवा त्यांच्या घरातील कोणताही सदस्य या बंगल्यात उपस्थित नसताना चोरटय़ांनी येथे हात साफ केला आहे. स्वतः आमदार खडसे हे बाहेरगावी असून बंगल्याला पुलूप लावलेले होते. याचीच संधी साधून चोरटय़ांनी डाव साधल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सकाळी ही घटना समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.