
गणपतीमूर्ती विक्री करणाऱ्या महिलेला बोलण्यात गुंतवून तीन महिला चोरट्यांनी त्यांच्या दुकानातून 50 हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली. तिच्या दोन महिला साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा गणेश मूर्ती विक्री व्यवसाय असून त्या येरवडा गाडीतळ परिसरात मूर्ती विक्री करीत होत्या. शुक्रवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास मूर्ती खरेदीच्या बहाण्याने तीन महिला स्टॉलजवळ आल्या. आरोपी महिलांनी मूर्ती खरेदीचा बहाणा केला. मूर्ती विक्रेत्या महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून त्यांनी स्टॉलमधील गल्ल्यातील 50 हजारांची रोकड लांबवत पोबारा केला.
रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर मूर्ती विक्रेत्या महिलेने येरवडा पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने तपास करून चोरट्या महिलेला पकडले. आरोपी महिला मूळची सांगोला परिसरातील असून तिच्या बरोबर असलेल्या दोन महिलांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वारंगुळे अधिक तपास करत आहेत.

























































