अडीच लाख रुपयांच्या बॅगेवर चोरट्याचा डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

439

गंगाखेडमधील मोंढा परिसरातील आडत दुकान उघडण्यासाठी जात असलेल्या व्यापाऱ्याची अडीच लाख रुपयांची बॅग एका अल्पवयीन चोरट्याने पळविली. ही घटना सोमवारी सकाळी 9.30 ते 10 वाजेच्या सुमारास घडली. शहरातील मोंढा परिसरात भरदिवसा झालेल्या या चोरीने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

गंगाखेड येथील आडत व्यापारी रंगनाथ रामराव जाधव हे सोमवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास मोंढा परिसरातील आडत दुकान उघडण्यासाठी दुचाकीने जात होते. मोंढा कॉर्नरवर एका पानटपरी समोर जाधव यांनी दुचाकी उभी केली. येथे काही लोकांसोबत जाधव बोलत होते. याचाच फायदा घेत एका अल्पवयीन चोरट्याने दुचाकीच्या हँडलला लावलेली पैशाची बॅग काही क्षणातच लांबवली. बुलेटवरील बॅग गायब झाल्याने जाधव भांबावून गेले. त्यांनी बॅगचा शोध घेतला. मात्र, बॅग सापडली नाही.

रंगनाथ जाधव यांनी तातडीने बॅग चोरीला गेल्याची व बॅग पळविणाऱ्या चोरट्याची माहिती दिली. यानंतर जमादार रंगनाथ देवकर, पोलीस शिपाई एकनाथ आळसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मोंढा कॉर्नरवर असलेल्या एका कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा अल्पवयीन मुलाने बुलेटला असलेली बॅग पळविल्याचे दिसून आले. सोमवार व शनिवार या आठवडी बाजाराच्या दिवशी किंमती मोबाईल, दुचाकी वाहने आदी पळविणाऱ्या चोरट्यांनी आता भरदिवसा मुख्य बाजार पेठेतून व्यापाऱ्याची बॅग लांबवल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या