शिरूरच्या पश्चिम भागातील कवठे येमाई, सविंदणेत चोरट्यांचा धुमाकूळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

शिरूरच्या पश्चिम भागातील कवठे येमाई येथील मातंगवस्ती तर सविंदणे येथे चोरट्यांनी आज बुधवार दि. ०७ ला पहाटेच्या सुमारास ५ ते ६ घरांना लक्ष करीत चोरीचा प्रयत्न केला आहे.

या घटनेत सविंदणे येथील एका घरातून अंदाजे दीड तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची माहिती मिळत असून कवठे येमाईच्या मातंग वस्तीतील ओढ्यालगत असलेल्या सुखराज पंचरास यांच्या घरात पहाटेच्या सुमारास मागील दरवाजा तोडून चोरटयांनी घरात प्रवेश करीत शोकेस उघडून त्यातील साहित्याची उलथापालथ केली. पंचरास कुटुंब गाढ झोपेत असताना चोरट्यांनी दरवाजा उघडत घरात प्रवेश केला. घरातील पुढील खोलीत झोपलेल्या संगीता पंचरास यांना आवाजाने जाग आल्याने व त्यांनी आरडाओरडा केल्याने चोरटयांनी अज्ञात हत्याराने त्यांच्यावर वार केला. तो वार मांडीवर बसल्याने चोरट्यांच्या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या आहेत.

कवठ्याचे सरपंच अरुण मुंजाळ,फक्कड पंचरास व ग्रामस्थांनी जखमी संगीता यांना तातडीने येथील रुग्णालयात नेत उपचार केले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे व त्यांचे सहकारी जाधव,पालवे घटनास्थळी दाखल झाले. दोन गावात चोरीच्या झालेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.