कोळपेवाडी शहाजापूर शिवारात घरफोडी; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
theft cirme
प्रातिनिधिक फोटो

शहाजापूर शिवारातील समर्थ नगरात रात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे. येथील घटनेत 7 तोळे सोन्याचे दागिने आणि 2 हजार 500 रुपये रोकड चोरट्यांनी लंपास केले आहेत.

समर्थ नगर येथील संजय यादव आवारे (वय 40, रा. समर्थ नगर) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आवारे यांच्या घरी सोमवारी रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या किचनच्या दरवाज्याची जाळी तोडून  22 हजार 284 रुपये किंमतीची दोन तोळे सोन्याची मोहन माळ, 82,200 रुपये किंमतीचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र, 60 हजार रुपये किंमतीचे दोन तोळ्याची गहू मणी मंगळसूत्र 284 रुपयांची अर्धा ग्रॅमची नथ असे एकूण 7 तोळे सोन्याचे दागिने आणि 2 हजार 500 रुपयांची रोकड असा एकूण  1 लाख 67 हजार 256  रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. सोमवारी दुपारी  या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. तर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक  कटके व  सचिन इंगळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन  पाहणी केली.

शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. दररोज दोन ते तीन घरफोड्या होत आहेत. पोलिसांना घरफोडीच्या घटना रोखण्यात आणि आरोपींना पकडण्यात अद्याप यश आलेले नाही. पोलिसांची गस्त प्रभावी होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.