सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाख सत्तर हजारांचा ऐवज चोरीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर शहरातील दत्तकृपा हाऊसिंग सोसायटीत राहणाऱ्या शुभांगी महेश सुरडकर त्यांच्या घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सुमारे 2 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. या प्रकरणी कामवाल्या महिलेवर याच्यावर संशयित म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजीनगर येथील शुभांगी महेश सुरडकर या लातूर येथील आपल्या माहेरी राहण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, 27 ग्रॅमचे मंगळसूत्र, तीन तोळ्याचे सोन्याचे नेकलेस असे एकूण दहा तोळे सोने व रोख वीस हजार रुपये पर्समध्ये ठेवून हॉलमध्ये आपल्या आई-वडिलांसह तसेच घरात काम करणारी महिला कल्पना उर्फ काशीबाई बबन शिंदे यांच्यासह सर्वजण हॉलमध्ये झोपलेले होते.

नऊ मे रोजी सकाळी उठल्यानंतर शुभांगी यांनी पर्स पाहिली असता त्यामधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या चोरीप्रकरणी संशयित म्हणून कल्पना उर्फ काशीबाई बबन शिंदे यांच्याविरूध्द शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.