पारनेरमध्ये भिंत तोडून तीन लाखांचा ऐवज लांबवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे घराच्या भिंतीला भगदाड पाडून अज्ञात चोरटयांनी सुमारे तीन लाख रूपये किंमीचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली. नगर बाजार समितीमध्ये नोकरीला असलेले विनायक देवराम गवळी यांनी यासंदर्भात तक्रार दिली असून पारनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गवळी व त्यांचे कुटूंब जेवण करून शनिवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास झोपले होते. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांचे शेजारी संपत रोहकले यांनी फोन करून तुमच्या घराच्या पाठीमागे उजेड दिसत असल्याचे सांगितले. गवळी व त्यांच्या पत्नीने घराच्या मागे जाऊन पाहिले असता त्यांच्या घराच्या भिंतीला भगदाड पाडले असल्याचे दिसून आले. घरातील सामानाची, कपाटाची उचकापाचक करण्यात आल्याचे, कपाट उघडे तसेच तीनपैकी दोन लोखंडी पेटया उघडया व एक पेटी आढळून आली नाही.

विनायक गवळी त्यांच्या घरातील सदस्य तसेच संपत रोहोकले, तानाजी रोहोकले यांनी घराच्या आजूबाजूस शोध घेतला असता घरापासून 400 मिटर अंतरावर त्यांच्याच शेतात एक पेटी उघडी पडलेली आढळून आली. गवळी यांनी घरात जाउन तपासणी केली असता कपाटातील पगाराचे पैसे, तसेच सुमारे आठ तोठे सोन्याच्या दागिने चोरटयांनी चोरल्याचे लक्षात आले. पोलिसांनी श्‍वान पथक, ठसेतज्ज्ञ घटनास्थळी पाचारण करून चोरटयांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एस. पंदरकर पुढील तपास करीत आहेत.