शहरात घरफोडीचे सत्र कायम; चार ठिकाणी घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील विविध भागात चोरट्यांकडून घरफोडीचे सत्र सुरूच असून चार ठिकाणी चोरी करून एक लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शुक्रवार पेठेत राहणारे अ‍ॅन्थेनी सनी फर्नांडिस (वय 61) हे रविवारी सकाळी कुटुंबासह प्रार्थनेसाठी गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाची कडी उचकटून घरातील 55 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. तक्रारदार हे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरी आले असता, त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कर्वे रस्त्यावरील पानटपरी फोडून चोरट्यांनी 5 हजार रूपयांची रोकड आणि इतर ऐवज असा 11 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी आकाश दिलीप पाटील (वय 25, रा. हिंगणे होम कॉलनी,कर्वेनगर) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तिसऱ्या घटनेत चोरट्यांनी विश्रांतवाडी येथील टिंगरेनगरमध्ये घराचे कुलूप तोडून 10० हजार 200 रूपयांचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी पराग तुळशीराम कोहाड (वय 46)यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चोरट्यांनी हडपसर परिसरातील एका दुकानातून 33 हजार रूपये किंमतीचे 5 मोबाईल चोरून नेले आहेत. याप्रकरणी दीपक मोहनलाल गंगावणी ( रा. फुरसुंगी) यांनी तक्रार दिली आहे. दीपक यांचे हडपसर परिसरातील गाडीतळ येथे मोबाईलचे दुकान आहे. या ठिकाणाहून चोरट्यांनी 5 मोबाईल आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस अधिक तपास करत आहेत.