
पुणे शहरात घरफोडीचे गुन्हे वाढत असून चोरट्यांनी वेगवेगळ्या भागातील फ्लॅटचे कुलुप तोडून 6 लाखांचा ऐवज लांबविल्याच्या घटना घडल्या आहेत. वारजे भागात अंकुश धुडे (वय 31, रा. वाराणसी सोसायटी, वारजे) यांच्या घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील 53 हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. धुडे यांनी याबाबत वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याच परिसरातील मधुकर अपार्टमेंटमधील घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे अधिक तपास करत आहेत.
कात्रजमधील दत्तनगर परिसरातील एका सोसायटीतील घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील पाच हजारांची रोकड आणि दागिने असा 1 लाख 79 हजारांचा ऐवज लांबविला. याबाबत संगीता शेंडगे (वय 51, रा. हेमी रेसिडन्सी, आंबेगाव रस्ता, दत्तनगर) यांनी भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सूरज कुतवळ अधिक तपास करत आहेत. हडपसर भागात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून रोकड आणि सोन्याचे दागिने असा 3 लाख 62 हजारांचा ऐवज लांबविला. शिवाजी हरगुडे (वय 38, रा. दुर्गामाता कॉलनी, महादेवनगर, हडपसर) यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पी. एम. शेळके तपास करत आहेत.






















































